कल्याण-नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष्य वेधण्याकरीता १० जून रोजी ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात भव्य मानवी साखळीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहित भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी दिली आहे. सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने ही मानवी साखळी तयार केली जाणार आहे.
यासंदर्भात माहिती देण्याकरीता प्रगती महाविद्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी भाजप नेते पाटील यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी समितीचे पदाधिकारी गंगाराम शेलार, गुलाब वङो, संतोष केणो, अजरून चौधरी, भास्कर पाटील, गजानन मांगरुळकर, नंदू म्हात्रे, दत्ता वङो आदी उपस्थित होते.यावेळी भाजप नेते पाटील यांनी सांगितले की, कोरोना नियमावलीचे पालन करुन ही मानवी साखळी तयार केली जाणार आहे. दहीसर मोरी ते शिळ, शिळ ते नेवाली, नवी मुंबई ते दिघा अशा विविध ठिकाणाहून ही साखळी तिन्ही जिल्ह्यातून केली जाणार आहे. लाखो लोक त्यात सहभागी होणार आहे. घोषणआबाजी न करता शांततेच्या मार्गाने सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे.
जगन्नाथ पाटील यांनी सांगितले की, दि. बा. पाटील हे लोकनेते होते. त्यांनी नवी मुंबईत ओबीसी, भूमीपूत्र, सिडकोसह अन्य प्रकल्प बाधितांना आंदोलन उभे केले. त्यामुळे भूमीपूत्रांना न्याय मिळाला. नवी मुंबईत येथे एक अधिवेशन २०१२ साली पार पडले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दि. बां. पाटील यांचे नाव विमानतळास देण्याबाबत सरकार दखल घेईल असे आश्वासित केले होते. २०१६ साली भाजप खासदार कपील पाटील यांनी केंद्र सरकारकडे संसदेत मागणी करुन विमान तळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा विषय ठेवला होता. २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी लक्ष घालून हा विषय केंद्राकडे पाठविला होता. श्याम म्हात्रे यांनी केंद्र सरकारकडे या विषयी पत्रव्यवहार केला होता. तेव्हा त्यांना सरकाकडून प्रतिउत्तर आले होते. सर्व पक्षीय संघर्ष समितीने विमान तळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी विद्यमान महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे. सरकारकडून त्याबाबत अद्याप ठोस काही निर्णय घेण्यात आलेला नाही. शिवसेनेकडून विमानतळास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी आहे. ठाकरे यांच्या नावाला आमचा विरोध नाही. मात्र शिवसेनेच्या मागणीच्या आधीपासून दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी त्याही आधीपासूनची आहे. सरकारने त्याचा विचार करावा. नाव देण्याचा विषयी राज्य सरकारने ठराव करुन केंद्र सरकारकडे पाठविणे अपेक्षित आहे. याकडे जगन्नाथ पाटील यांनी लक्ष वेधले.