कल्याण : सुभाष मैदानाच्या दुरवस्थेबाबत मनसेने सह्यांची मोहीम राबवत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना मैदानाच्या दुरवस्थेबाबतचे फोटो भेट दिले. येत्या आठ दिवसात मैदान सुस्थितीत झाले नाही तर मैदानातील कचरा, घाण अधिकाऱ्यांच्या दालनात टाकण्याचा इशारा यावेळी मनसेने दिला.
पश्चिमेकडील सुभाष मैदानाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. मैदानातील जॉगिंग ट्रॅकवर ड्रेनेजचे पाणी येते, मैदानात अस्वच्छतेचे साम्राज्य आहे, स्वच्छतागृहाची दुरवस्था आहे, महिलांसाठी चेंजिंग रूम नाही. त्यामुळे मैदानात खेळण्यास येणाऱ्या खेळाडूंना विविध समस्यांना सामोरे जावे लागते.
येथे येणाऱ्या खेळाडूंनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्या मात्र महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. आज मनसेचे माजी आमदार व शहर अध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केडीएमसीचे अधिकारी संजय जाधव यांची भेट घेत मैदानाच्या दुरावस्थेबाबत जाब विचारला.
मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मैदानाची ही अवस्था तर इतर मैदानाचं काय? असा सवाल करत मैदानाच्या दुरावस्थेचे फोटो भेट देण्यात आले. आठ दिवसांत मैदानाचे काम पूर्ण करावे अन्यथा मैदानातील घाण कचरा अधिकाऱ्यांच्या दालनात टाकू असा इशारा यावेळी देण्यात आहे.