कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर नागरीकांनी गोंधळ घातल्याची घटना आज सायकांळी घडली. या वेळी पालिका कर्मचारी रमेश पौळकर यांना सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याचे गोंधळ घालणाऱ््या नागरीकांनी सांगितले. पौळकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागरीकांना दोन तास ताटकळत ठेवल्याने नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आज मंगळवारी आयुक्तांना नागरीकांना भेटण्याची वेळ असते. मागच्य मंगळवारी आयुक्त काही कामानिमित्त बाहेर असल्याने मंगळवारी नागरीकांना त्यांना भेटता आले नव्हते. आज ५१ नागरीकांनी आयुक्तांच्या भेटीचे टोकन महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे. यामध्ये अनेक नागरीकांच्या विविध स्वरुपाच्या तक्रारी आणि अर्ज होते. त्यासंदर्भात नागरीकांना प्रत्यक्ष भेटून आयुक्तांना सांगण्यासाठी नागरीक आयुक्ताच्या दालनाबाहेर उभे होते. त्यांना सुरक्षा रक्षकांकडून गेटवर टाेकन विचारुन सोडले जात होते. मात्र काही नागरीकांच्या मते दोन तासांपासून त्यांना ताटकळत ठेवले होते. या रांगेत पालिका कर्मचारी रमेश पौळकर हे देखील होते.
पौळकर हे कोकण विभाग अनुसूचित जाती जमाती महासंघाचे महासचिव आहे. त्याचबरोबर एका कामगार संघटनेचे ते काम पाहतात. कामगारांच्या समस्या त्यांनाही मांडायच्या होत्या. यावेळी त्यांना सुरक्षा रक्षक अधिकारी सुरेश पवार आणि महिला सुरक्षा रक्षक सरिता चरेगावकर यांनी मारहाण केल्याचा आरोप नागरीकांनी केला. या घटनमुळे आयुक्त कार्यालयाबाहेर एकच गोंधळ उडाला. नागरीकांनी पौळकर यांना मारहाण झाल्याचे सांगितले. काही वेळेकरीता पौळकर यांना आयुक्तांच्या केबीन लगत असलेल्या ठिकाणी बसवून ठेवले होते. नागरीकांना आत सोडले जात नव्हते. थोड्या वेळेनंतर पौळकर यांना बाहेर आणले. त्यांना सुरक्षा अधिकारी पवार व महिला सुरक्षा रक्षक चरेगावकर यांनी मारहाण केल्याचे सांगितले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले आहे.
यासंदर्भात महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले की, ही घटना आयुक्त दालनाबाहेर घडली आहे. त्यामुळे काही बोलण्यास नकार दिला. त्याचबरोबर सुरक्षा रक्षक अधिकारी पवार आणि महिला सुरक्षा रक्षक चरेगावकर यांनीही याविषयी काही बोलण्यास नकार दिला आहे. ही घटना आयुक्त दालनाबाहेर घडली असल्याने त्याठिकाणच्या सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला असणार. त्यावरुन घटनेची सत्यता समोर येणार आहे