लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोरोनाच्या प्रादुर्भावात आतापर्यंत कल्याण परिमंडळातील ३४४ पोलीस कर्मचारी आणि ३७ अधिकारी, अशा एकूण ३८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर सात जणांना उपचारादरम्यान आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, ३६१ पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. यात ३८ अधिकाऱ्यांसह ३२३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.कोरोनाच्या रुग्णसंख्येत कल्याण- डोंबिवलीत दिवसागणिक वाढ होत आहे. सद्य:स्थितीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: कहर केला आहे. दिवसाला हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. सद्य:स्थितीला रोजच्या मृत्यूंचा आकडा पाच ते सातपर्यंत पोहोचला आहे. आजमितीला बाधितांचा आकडा एक लाख सात हजार ५८४ पर्यंत पोहोचला आहे. यातील ९० हजार ४५ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत, तर एक हजार ३२९ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी मार्च ते जून महिन्यांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेला पहिल्या लॉकडाऊनची यशस्वीरीत्या अंमलबजावणी करण्यात परिमंडळ-३ मधील पोलिसांची सर्वांत महत्त्वाची भूमिका राहिली. तपास नाके असोत की रुग्णालयात किंवा क्वारंटाइन सेंटर आणि कंटेन्मेंट झोन, अशा प्रत्येक ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून पोलीस आपली जबाबदारी पार पाडताना दिसले. कोरोनाच्या प्रादुर्भावात लॉकडाऊनमध्ये दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून जबाबदारी पार पाडणारे पोलीस नंतरही गणशोत्सव व नवरात्रौत्सव, अशा सणांमध्येही बंदोबस्तात व्यस्त होते. पोलिसांना जबाबदारी पार पाडताना सोशल डिस्टन्स ठेवता येत नाही, वेळोवेळी लोकांची मदत करावी लागते. त्यासाठी संपर्कातच राहावे लागते. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे चित्र राज्यभरात दिसून आले.
दाेन कर्मचाऱ्यांवर सुरू आहेत उपचार कल्याण परिमंडळ-३ चा आढावा घेता आतापर्यंत ३८१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात खडकपाडा, महात्मा फुले चौक, कोळसेवाडी आणि मानपाडा पोलीस ठाण्यांतील पोलिसांची संख्या मोठी आहे. सद्य:स्थितीला दोन कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एक अधिकारी आणि १४ कर्मचारी होम आयसोलेशनमध्ये, तर दोन अधिकारी आणि १२ कर्मचारी होम क्वारंटाइन आहेत.