प्रशांत माने,डोंबिवली: आईचे सराफाकडे गहाण ठेवलेले मंगळसूत्र सोडवले पण मंगळसूत्र ठेवलेली बॅग च रिक्षातच विसरल्याचा प्रकार प्रवासी रोहित पासवान यांच्याबाबतीत बुधवारी घडला. बॅग गहाळ झाल्याची तक्रार मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी बॅगेचा शोध लावत मंगळसूत्रासह ती पासवान यांच्याकडे सुपूर्द केली. १ तोळयाचे ६० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र परत मिळवून दिल्याबद्दल पासवान यांनी पोलिसांचे आभार मानले.
रोहीत हे मीरारोड येथे राहतात. त्यांच्या आईचे बिहार येथील गावी सराफाकडे सोन्याचे मंगळसूत्र गहाण ठेवले होते. ते मंगळसूत्र सोडविण्यासाठी रोहीत गावी गेले होते. तेथून घरी परतत असताना नातेवाईकांना भेटण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात उतरले. डोंबिवलीतील नातेवाईकांकडे येण्यासाठी त्यांनी कल्याण स्थानकातून रिक्षा पकडली. रिक्षाचालक त्यांना इच्छीत स्थळी सोडून निघून गेला. परंतु तो गेल्यावर आपली बॅग रिक्षात राहिल्याचे रोहीत यांच्या लक्षात आले. बॅगेत सराफाकडून सोडवून आणलेले आईचे मंगळसूत्र होते त्यामुळे रोहीत यांचा जीव कावराबावरा झाला.
त्यांनी थेट मानपाडा पोलिस ठाणे गाठले आणि बॅग हरविल्याची तक्रार दिली. पोलिस हवालदार यलप्पा पाटील आणि पोलिस नाईक महादेव पवार यांनी रिक्षाचा तपास करण्यास सुरूवात केली. दरम्यान ज्याठिकाणी रिक्षातून रोहीत उतरले तेथील परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासले. त्याआधारे रिक्षाचा आणि चालकाचा शोध घेतला असता संबंधित बॅग मिळून आली. बॅग आणि त्यातील मंगळसूत्र वरीष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने आणि सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वनवे यांच्याहस्ते रोहीत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.