अनिकेत घमंडी डोंबिवली : ‘ऑक्सिजन देता का कुणी ऑक्सिजन,’ अशी म्हणण्याची वेळ सध्या ठिकठिकाणच्या कोरोना रुग्णांवर आली आहे. मात्र, तुकारामनगर प्रभागाचे माजी नगरसेवक नितीन पाटील हे वर्षभरापासून कोरोना रुग्णांना विनामूल्य ऑक्सिजन पुरवत आहेत. त्यांच्या या सेवेमुळे आतापर्यंत शेकडो रुग्णांना जीवदान मिळाले आहे.
मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. पाटील यांनी एप्रिल २०२० मध्ये २० ऑक्सिजन सिलिंडर विकत घेतले. या सिलिंडरद्वारे त्यांनी वर्षभरात शेकडो रुग्णांना विनामूल्य ऑक्सिजन सिलिंडरची सेवा पुरवली आहे. पाटील यांनी आधी केवळ त्यांच्या प्रभागापुरती ही सेवा सुरू केली होती. मात्र, हळूहळू आजूबाजूच्या परिसरात आणि आता शहरभर या उपक्रमाची व्याप्ती वाढली आहे. पाटील यांच्या कार्यालयात वैद्यकीय प्रमाणपत्र, अन्य आवश्यक कागदपत्र सादर केल्यावर उपलब्धतेनुसार सिलिंडर दिले जात आहेत. ऑक्सिजनची पातळी योग्य प्रमाणात झाली की तातडीने ते सिलिंडर परत करण्याचे आवाहन त्यांच्यातर्फे रुग्णांना नातेवाइकांना केले जात आहे.
पाटील म्हणाले, एप्रिल ते नोव्हेंबर २०२० दरम्यान ऑक्सिजन सिलिंडरला खूप मागणी होती. त्यानंतर त्यात घट झाली. मात्र, महिनाभरापासून पुन्हा मागणी वाढली आहे. सध्या ऑक्सिजन सिलिंडरसाठी अनेक जण वेटिंगवर आहेत. आणखी सिलिंडर विकत घेण्याची तयारी आहे. मात्र, रिफिलिंगची समस्या मोठी आहे. वर्षभर मला माझ्या निकटवर्तीयांनी हे सिलिंडर रिफिल करून आणण्यासाठी सहकार्य केले आहे. त्यासाठी रोज सुमारे १० हजारांचा खर्च येत आहे.