लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली: येथील पश्चिमेकडील कोपरगाव परिसरातील लक्ष्मण पावशे नामक दुमजली धोकादायक इमारतीचा भाग कोसळल्याची घटना आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास घडली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. महिनाभरातील डोंबिवलीतील इमारत पडझडीची ही दुसरी घटना आहे. १५ सप्टेंबरला पुर्वेकडील आयरेरोड परिसरातील आदिनारायण भुवन ही अतिधोकादायक इमारत कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आजच्या घटनेने पुन्हा एकदा शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लक्ष्मण पावशे ही धोकादायक इमारत ३५ वर्षापूर्वीची आहे. या दुमजली इमारतीत नऊ खोल्या होत्या. इमारतीत पाच कुटुंब राहत होती. दरम्यान सकाळपासूनच या इमारतीत माती पडत असल्याने दुपारीच इथली कुटुंब इमारतीबाहेर पडली होती. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास इमारतीचा दर्शनी भाग कोसळला. कुटुंब तत्पुर्वीच इमारतीबाहेर पडल्याने सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. मात्र सामान घरातच राहिल्याने वित्तहानी झाली आहे.
एका वाहनाचे देखील नुकसान झाले आहे. दरम्यान घटनेची माहीती मिळताच केडीएमसीच्या ह प्रभागक्षेत्राच्या सहाय्यक आयुक्त स्नेहा करपे यांनी अधिका-यांसह घटनास्थळी धाव घेतली. केडीएमटीचे माजी सदस्य संजय पावशे हे देखील घटनास्थळी होते. ही इमारत त्यांची वडीलोपार्जित असल्याची माहीती त्यांच्याकडून मिळाली. दरम्यान इमारत धोकादायक असल्याने ती पुर्णपणे तोडली जाणार असल्याची माहीती महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दिली.