कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालया लगत असलेल्या महापालिकेच्या जुन्या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. ही इमारत धोकादायक असल्याचे महापालिकेने घोषित केले आहे. या इमारतीत काही व्यावसायिक दुकानाचे गाळे सुरु आहेत. इमारतीचा काही भाग कोसळल्याने या व्यावसायिक दुकानाच्या गाळेधारकांसह दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या जिविताला धोका होऊ शकतो. त्यामुळे ही धोकादायक इमारत महापालिकेने वेळीच जमीनदाेस्त करण्याची गरज आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेचे जुने कार्यालय या इमारतीत होते. महापालिकेच्या कारभाराचा पसारा वाढल्यावर या इमारतीत महापालिकेने क प्रभाग कार्यालय सुरु केले होते. सहा वर्षापूर्वी या इमारती क प्रभाग कार्यालय सुरु होते. ही इमारत धोकादायक झाल्याने महापालिकेने क प्रभाग कार्यालय सांगळेवाडीतील दामोदराचार्य सभागृहाच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर हलविण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या इमारतीत प्रशासकीय कामकाज सुरु नाही. मात्र इमारतीच्या तळ मजल्यावर काही व्यापारी दुकाने सुरु आहेत.
इमारत धोकादायक असल्याने महापालिकेकडून ही इमारत पाडण्यात येणार होती. मात्र इमारतीतील दुकानदारांपैकी एकाने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महापालिकेच्या कारवाईस स्थगिती आदेश दिला होता. ही इमारत महापालिका मुख्यालयास लागूनच मुख्य बाजारपेठ जाणाऱ््या रस्त्याला लागूनच आहे. इमारत कोसळल्यास रस्त्यावरील पादचारी आणि नागरीकांसह तळ मजल्यावरील दुकानदारांच्या जिवितास धोका होऊ शकतो. या धोकादायक इमारतीचा काही भाग आज कोळसल्याने महापालिकेने त्याठिकाणी ब’रेकेट लावले आहेत.