डोंबिवली - ऑक्टोंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी भागातील पोस्ट ऑफिसच्या आवारात पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी दिली. केंद्राच्या संचार राज्य मंत्रालयाकडून शिंदे यांना नुकतेच त्याबाबत सूचित करण्यात आले आहे. २०१७ पासून शिंदे त्यासाठी।पाठपुरावा करत आहेत. मात्र आधी जागेअभावी पासपोर्ट सेवा केंद्रास विलंब झाला होता. त्यानंतर शिंदे यांनीच पुढाकार घेत डोंबिवली एम.आय.डी.सी येथील पोस्ट ऑफिसची निवड करण्यात आली होती.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी विलंब झाल्याचे प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट।म्हंटले आहे. त्या सेवाकार्यात विलंब होऊ नये यासाठी शिंदे यांनी लोकसभा अधिवेशनदरम्यान संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी त्या कामात दिरंगाई न करता लवकरच लवकरच पासपोर्ट सेवाकेंद्र सुरु करण्याचे आश्वासित केले होते. केंद्र सरकारच्या गेल्यावेळी युतीच्या कालखंडात दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कार्यकाळात देशभरात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शिंदे यांनी त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून कल्याण लोकसभा मतदारसंघात डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळवली. आता ती मागणी पूर्णत्वास जाऊन लवकरच त्या सेवेचा शुभारंभ होणार आहे त्यासाठी शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालय टपाल खात्यांचे मनपूर्वक आभार मानले आहे.
ठाण्यामधील पासपोर्ट सेवा केंद्र हे संपूर्ण एम एम आर प्रदेशातील एकमेव सेवा केंद्र असल्यामुळे या सेवा केंद्रावर मोठा ताण पडत होता. तसेच नागरिकांनाही लांब अंतरावरून यावे लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होते. त्यामुळे आता डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यास ठाणे जिल्ह्यातील उपनगर शहरांना खासकरून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर व इतर उपशहरांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.