डोंबिवली : हवामान खात्याने जेव्हा अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला तेव्हाच पॉजची टीम आपत्ती व्यवस्थापनासाठी तयार होती. ह्या पावसाळ्याच्या पहिल्या 5 दिवसांत म्हणजे आठ ते बारा जूनमध्ये पॉजच्या हेल्पलाईनला सुमारे 21 कॉल आले. त्यामध्ये 3 कावळे, 1 चिमणी, 6 कबुतरे, 2 घार, 5 बगळे, 1 रातबगळा आणि 3 सापांसाठी कॉल्स आले होते. या वन्यजीव पक्षांचा जीव वाचविण्यासाटी पॉजवर जबाबदारी अन् विश्वास दाखविण्यात आला, जो पॉजने सार्थ केला.
विशेष म्हणजे यात डोंबिवली परिसरात दुर्मिळ असा ब्राँझबॅक ज्याला मराठीत रुखई म्हणतात, हाही पॉजच्या सर्प मित्र ऋषी सुरसे यांना मिळाला. शनिवारी सकाळच्या पावसात एक घार पावसात चिंब भीजल्याने डोंबिवली पश्चिम मधून पॉजला कॉल आला तेव्हा पॉजचे पक्षीमित्र रोहित सातवसे ह्यांनी घारीला वाचवून, तिला संस्थेत आणून ड्रायरने त्याचे पंख सुकवले आणि दुपारी पुन्हा निसर्गात मुक्त केले. पॉजचे स्वयंसेवक ह्या कामात ट्रेन आहेत. सध्या 1 व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यात वीज खांबावर चढून एक व्यक्ती पक्षी सोडवायला जातो आणि शॉक लागून खांबवरून खाली पडून मरतो. गुजरातमधली ही घटना असली तरी स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि कोणतीही सुरक्षा साधने न वापरता काम करतो. जोशात पशु-पक्षी वाचवण्याचा नादात अपघात, किंवा बाईट किंवा वन्यजीवकडून हल्ला होऊ शकतो असे पॉजचे संस्थापक निलेश भणगे म्हणाले.
गेल्या वर्षात पॉजच्या कार्यकर्त्यांनी डोंबिवली कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर येथून सुमारे 95 पक्षी वाचवले आणि त्यांचे पुनरर्वसन करून निसर्गात मुक्त केले. पॉजच्या कामात निलेश भणगे आणि अनुराधा रामस्वामी ह्यांचा नेतृत्वखाली राज मारू, अभिषेक सिंग, ऋषी सुरसे, रोहित सत्वसे, हरिहरन, रिघा परमेश्वरन, साधना सभारवाल, देवेंद्र निलाखे हे मदत करत असल्याचे पॉजचे निलेश भणगे म्हणाले.