प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: रिंगरूट प्रकल्प बाधित शेतक-यांना टिडीआर नको रोख स्वरूपात मोबदला दया या मागणीसाठी रविवारी येथील देवीचापाडा, चिंचोडयाचा पाडा, कुंभारखाण पाडा व नवापाडा येथील भूमिपुत्र शेतक-यांनी एकत्र येत लक्षवेधी आंदोलन छेडले. कुठल्याही प्रकारे शेतक-यांना विश्वासात न घेता जमिनी ताब्यात घेतल्या जात असल्याचा आरोप करीत मनपाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात संबंधितांनी धाव घेतली आहे.
केडीएमसीच्या ३० ते ४० मीटर रूंद रस्ता रिंगरूट प्रकल्पात बाधित होत आहे. मौजे ठाकुर्ली, गावदेवी, शिवाजीनगर, चोळे आदि गावातून रिंगरूट (बाह्यवळण रस्ता) प्रकल्प होणार आहे. यात परंतु केडीएमसीकडून संबंधित जमीन मालक अथवा शेतकरी यांची कोणतीही वैयक्तिक सुनावणी अथवा म्हणणे मांडण्याची संधी न देता तसेच आर्थिक मोबदल्यावियी संबंधितांकडून कोणताही प्रस्ताव न स्विकारता एकतर्फी आणि मनमानीपणे शेतक-यांच्या जमीनी ताब्यात घेतल्या जात आहे.
मनपाने टिडीआरच्या स्वरूपात मोबदला घोषित केला आहे पण अनेक शेतक-यांकडे जमीनच शिल्लक राहत नाही. त्यामुळे टिडीआरचा मोबदला कागदावरच राहणार आहे याकडे शेतक-यांनी लक्ष वेधत टिडीआर ऐवजी रोख स्वरूपात मोबदला दया अशी मागणी केली आहे. दरम्यान मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात शेतक-यांनी सकाळी १० ते १२ यावेळेत देवीचा पाडा चकाचक शिव मंदिर याठिकाणी एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन छेडले होते.