डोंबिवली: राज्य शासनाकडून व जिल्हा प्रशासनाकडून तसेच ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांकडून नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन मिळून एकजुटीने लोकाभिमुख काम करतील, असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला. 75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा साकेत पोलीस परेड मैदान, ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात येवून त्यास सलामी देण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, विशेष महानिरीक्षक प्रवीण पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) डॉ. महेश पाटील, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय जाधव, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, ठाणे ग्रामीण पोलीसच्या अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली घाटे-घाडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) गोपीनाथ ठोंबरे,उपजिल्हाधिकारी विकास गजरे, रेवती गायकर, दिपक चव्हाण, उर्मिला पाटील, रोहित राजपूत, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, पोलीस उपायुक्त श्री. गणेश गावडे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, समाज कल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रमोद काळे, संजय बागूल, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक पंडित राठोड, जिल्हा कौशल्य विकास सहायक आयुक्त संध्या साळुंखे, सहायक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, तहसिलदार संजय भोसले, युवराज बांगर, रेवण लेंबे, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली.
सुरुवातीलाच भारत देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी बलिदान दिलेल्या महान विभूतींच्या स्मृतीला अभिवादन करुन विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक बंधू-भगिनी, अधिकारी-कर्मचारी तसेच पत्रकार बंधू-भगिनी व तमाम जिल्हावासियांना 75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देवून शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर म्हणाले की, विविध धर्म, भाषा, प्रांत, संस्कृती जोपासणाऱ्या भारतीयांचा जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश. भारतीय संविधानातील मूलतत्वे संविधानिक हक्क आणि कर्तव्य, स्वातंत्र्य भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी आहेत. आपण साजरा करीत असलेला प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविध प्रयत्नांमुळे आपली लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे. सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून मतदानात सहभाग घेणे आवश्यक आहे. तसेच स्वत:बरोबर इतर सहकाऱ्यांनाही मतदानाच्या कर्तव्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपले राज्य विविध आघाड्यांवर मार्गक्रमण करीत आहे. समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध घटकांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध आहे.
गेल्या 75 वर्षात आपला देश विविध क्षेत्रात प्रगतीशिल राहिला आहे आणि आता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशाची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सन 2047 पर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पास कृतिशील सहकार्य करण्याचे प्रधानमंत्री महोदयांनी आवाहन केले आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्राचेही योगदान असावे, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन अहोरात्र काम करीत आहे. नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व सुप्रसिध्द दिग्दर्शक राजदत्त, उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळालेले खासदार डॉ.श्री.श्रीकांत शिंदे यांचे त्याचप्रमाणे क्रीडा, साहित्य, प्रशासन, उद्योग, सांस्कृतिक, शिक्षण, स्वच्छता, सामाजिक, कला अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन आपल्या ठाणे जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव उज्जवल करणाऱ्या सर्वांचे शिक्षणमंत्री श्री. केसरकर यांनी अभिनंदन केले व ते म्हणाले, दि.14 ते 28 जानेवारी 2024 या दरम्यान राज्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषेचा स्वाभिमान जपण्यासाठी तुम्ही-आम्ही सर्वांनी मिळून विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.
ते म्हणाले, राज्य शासनाच्या गेल्या वर्षभराच्या काळात गरीब, वंचित, शेतकरी, युवा, महिला, बेरोजगार अशा सर्वच घटकांसाठी निर्णय घेतले आहेत. हे शासन लोकाभिमुख शासन असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ मिळावा, या दृष्टीने हे शासन सदैव प्रयत्नशील आहे. शासनाने गेल्या वर्षभरात सामान्य माणसाच्या विकासासाठी व हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. शासन आपल्या दारी सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून लाखो गरजूंना शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ दिला. महाराष्ट्राला एक ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य शासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच दावोस येथील जागतिक परिषदेत विविध कंपन्यांसोबत करार करून राज्य शासनाने 1.37 लाख कोटींची गूंतवणूक महाराष्ट्रात आणली आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पालकमंत्र्यांच्या भूमिकेतून राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई व ठाणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींकडून ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, रस्त्यांचा विकास, शेती क्षेत्राच्या प्रगतीसाठी नेहमीच पुढाकार घेण्यात येत आहे. सन 2023-24 या वर्षासाठी एकूण 750 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा 132 कोटी रुपयांनी हा निधी जास्त आहे, यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील कामांची निकड, कामांची आवश्यकता आणि लोकप्रतिनिधींची मागणी याचा विचार करून रुपये 1 हजार 16 कोटींचा एकत्रित जिल्हा नियोजन आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने संमती दिली आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, सर्वसामान्यांना परवडणारी घरे मिळावीत, या उद्देशाने बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांबरोबरच परवडणाऱ्या घरांची निर्मितीही करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. नुकताच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आशिया खंडातील सर्वात मोठ्या समूह विकास (क्लस्टर) योजनेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या क्लस्टर योजनेतून गरजूंना पहिल्या टप्प्यात 10 हजार घरे मिळणार असून एकूण 1 हजार 500 हेक्टर जागेवर टप्प्याटप्प्याने ही योजना राबविण्यात येणार आहे. देशभरातील शेवटच्या गरजू नागरिकाला शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेमार्फत ठाणे जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतीमधील तब्बल 1 लक्ष 60 हजार 158 लाभार्थ्यांना विविध शासकीय लाभ देण्यात आले. स्वच्छता मोहिमेविषयी बोलताना केसरकर यांनी 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या मोहिमेत ठाणे शहरात स्वच्छतेचे नवे पर्व सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता मोहिमेची सुरूवात ठाण्यात 30 डिसेंबर 2023 पासून झाली आहे. ही मोहीम 24 फेब्रुवारी 2024 पर्यंत सुरू राहणार आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, सारथी प्रकल्प अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील मराठा/कुणबी/ मराठा-कुणबी/कुणबी-मराठा प्रवर्गातील ग्रामीण भागातील 180 व शहरी भागातील 620 असे एकूण 800 उमेदवारांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने 'कौशल्य केंद्र आपल्या दारी' या संकल्पनेतून 289 नामांकित उद्योजकांसमवेत केलेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून 2 लाख 7 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. पोलीस दलाचे आधुनिकीकरण करणे व वाहतूक बळकटीकरण करणे, राज्यातील प्रत्येक पोलीस ठाणे अंतर्गत "आपले पोलीस" ही संकल्पना अंमलात आणणे तसेच जिल्हा पोलीस गस्त प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने मोटार वाहने खरेदी योजनेंतर्गत ठाणे ग्रामीण पोलीस दलाकरिता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 1 कोटी 18 लाख 45 हजार रुपये इतक्या निधीमधून एस्कॉर्ट करिता एकूण 9 चारचाकी वाहने, ठाणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयांतर्गत 6 कोटी 25 लक्ष 44 हजार रुपये इतक्या निधीतून 50 वाहने आणि नवी मुंबई पोलीस दलाकरिता रु.2 कोटी 3 लाख 29 हजार इतक्या निधीतून एकूण 17 वाहने खरेदी करण्यात आली आहेत. तर सन 2023 मध्ये पोलीस शिपाई पदाच्या 521 रिक्त जागांची भरतीही घेण्यात आली. महापे येथील जेम्स अॅण्ड ज्वेलरी पार्क प्रकल्प हा प्रकल्प एक वर्षात कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात आली असून या प्रकल्पामुळे नवीन गुंतवणूक होणार असून एकूण 1 लाख रोजगार निर्मिती होईल व दुप्पटीने निर्यात वाढणार आहे. आपल्या जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी ही मोठी संधी आहे, असे सांगून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत गतिमानता पंधरवडा आणि विकसित भारत यात्रेच्या माध्यमातून 119 वरुन 1 हजार 528 अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले व बँक मंजूरी प्रकरणे 28 वरुन 189 झाली, असेही ते म्हणाले.केसरकर पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्ताने जिल्हास्तरावर 15 कार्यशाळा व मेळावे घेण्यात आले. तसेच जिल्हा मिलेट महोत्सवाच्या माध्यमातून जिल्हयात 1 हजार 109 मिलेट जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले आणि 69 हजार 155 शेतकरी, नागरिकांपर्यंत विविध माध्यमातून पौष्टिक तृणधान्याचे महत्व पटवून देण्यात आले. येणारे वर्ष हे निवडणूकांचे वर्ष असणार आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला संविधान दिले. लोकशाहीचे कटाक्षाने पालन करणारा देश अशी आपल्या भारत देशाची ओळख आहे. ठाणे जिल्हयात 23 जानेवारी 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील मतदार नोंदणीचे काम उत्कृष्ठ केल्याबद्दल मतदान नोंदणी अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांना राज्यस्तरावर गौरविण्यात आले आहे. या जिल्ह्यात पुरुष-34 लाख 49 हजार 577, स्त्री-29 लाख 41 हजार 715 आणि इतर 1 हजार 228 असे एकूण 63 लाख 92 हजार 520 मतदार आहेत. लोकशाही अधिक बळकट आणि विश्वासार्ह करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी, युवा मतदारांनी मतदान करावे आणि आपल्या राष्ट्रीय कर्तव्याचे पालन करावे, असे आवाहन करुन श्री. केसरकर यांनी राज्य शासनाकडून व जिल्हा प्रशासनाकडून, ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांकडून नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्कीच केला जाईल, यासाठी आपण सर्व एकजुटीने लोकाभिमुख काम कराल, असा विश्वास व्यक्त केला. या सोहळ्याच्या निमित्ताने उल्लेखनीय सेवा बजावलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचारी, जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित मार्गदर्शक, खेळाडू, जिल्हा युवा पुरस्कार विजेता व्यक्ती, संस्था, महाराष्ट्र राज्य नाविन्यता पुरस्कार विजेते विद्यार्थी, नागरी संरक्षण दलातील उत्कृष्ठ सेवा बजावलेले अधिकारी, महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उत्कृष्ठ काम केलेली रुग्णालये या सर्वांना शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. यावेळी या संचलनात राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 11, पोलीस मुख्यालय ठाणे शहर (पुरुष), ठाणे ग्रामीण पोलीस, शहर परिमंडळ पोलीस व इतर शाखा, पोलीस मुख्यालय ठाणे शहर (महिला), शहर वाहतूक पोलीस, गृहरक्षक दल (पुरुष), अग्निशमन दल, ठाणे, महाराष्ट्र सागरी मंडळ, महाराष्ट्र उत्पादन शुल्क, ठाणे, ठाणे महानगरपालिकेचे महिला व पुरुष सुरक्षा पथक, गृहरक्षक दल (महिला), सरस्वती विद्यालय, राबोडी, या शाळेतील गाईड व स्काऊटचे पथक, स्टुडंट्स पोलीस कॅडेट्स, टेमघरपाडा, माध्यमिक विद्यालय महानगरपालिका, भिवंडी च्या मुले व मुलींचे पथक, बँड पथक, बीट मार्शल ताफा, जलद प्रतिसाद पथक यासह रॅपिड इंटरवेन्शन व्हेईकल, वरुण वॉटर कॅनन, अग्निशमन दल, जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे 108 ॲम्ब्युलन्स ही वाहने सहभागी झाली होती. या संचलनाचे नेतृत्व भिवंडी शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त मंदार जवळे यांनी केले. तर त्यांना दुय्यम परेड कमांडर म्हणून ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक राजेंद्र कत्तुल यांनी उत्कृष्ठ साथ दिली. कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री महोदयांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली.