डोंबिवली: टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित क्रिएटिव्ह कॅनव्हास २०२४ या चित्रकला स्पर्धेत सुमारे साडेसातशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. टिळक नगर विद्यामंदिर शाळेच्या पटांगणात रविवारी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मंडळातर्फे गेली पंधरा वर्षे आयोजित करण्यात येणाऱ्या चित्रकला स्पर्धेचे सन २०१८ नंतरच्या दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या यंदाच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये आयोजिण्यात आलेल्या या स्पर्धेचे आयोजन अनोख्या पद्धतीने करण्यात आले होते. विद्यानिकेतन शाळेच्या तब्बल १७१ विद्यार्थ्यांनी, ग्रींस इंग्लिश स्कूलच्या १४१ विद्यार्थ्यांनी तर मंजुनाथ विद्यालय या शाळेच्या ११७ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
तसेच डोंबिवली शहरापासून दूर अंतरावर असणाऱ्या पलावा तसेच रीजन्सी अनंतम् येथील विद्यार्थ्यांनी देखील या स्पर्धेत सहभाग घेतला होता. मंडळाने पाच गटात आयोजलेल्या या स्पर्धेमध्ये खुल्या गटामध्ये सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांना सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले. आणि विशेष म्हणजे ऐनवेळी केलेल्या या आवाहनास पालकांनी भरभरून प्रतिसाद देत सुमारे ४० पालक ऐन वेळेस स्पर्धक म्हणून सहभागी झाले आणि त्यापैकी सुनयना मढव यांनी पारितोषिक देखील पटकावले. इयत्ता पहिली व दुसरी तील विद्यार्थ्यांचा पहिला गट, तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांचा दुसरा गट तर पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांचा तिसरा गट आणि आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी चौथा गट अशी विभागणी करण्यात आली होती. तसेच कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी आणि इतर चित्रकारांसाठी खुला गट देखील ठेवण्यात आला होता.
विमल शहा, दीप्ती भिडे, अपर्णा कुलकर्णी , दिगंबर जोगमार्गे आणि विनायक कुलकर्णी या चित्रकलेतील तज्ञ शिक्षकांनी या स्पर्धेचे स्पर्धा चालू असते वेळीच परीक्षण केले आणि स्पर्धा संपल्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये सुमारे अडीचशे ते तीनशे चित्रांमधून सर्वोत्तम चार चित्रांची निवड करून दिली. स्पर्धेचे सहप्रायोजक असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट चे अतुल चक्रदेव व श्रीमती अंजलीताई चक्रदेव, लायन्स क्लब ऑफ डोंबिवलीचे अध्यक्ष श्री अमोल पोतदार व सेक्रेटरी पर्णाद मोकाशी आणि तिसरी सहप्रयोजक संस्था असणाऱ्या जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचे महेंद्र संचेती हे पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित होते. प्रत्येक गटातून तीन क्रमांक व उत्तेजनार्थ एक अशा पद्धतीने पारितोषिके देण्यात आली तर सर्व ७५० सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले. यंदाच्या वर्षी स्पर्धेमध्ये दोन विशेष मुलांनी सहभाग घेतला होता. या दोघांनाही विशेष पारितोषिक देऊन मंडळातर्फे प्रोत्साहन देण्यात आले.
तर अवघ्या साडेपाच वर्षाच्या चिमुकलीने देखील आपली कला सादर केली त्याबद्दल तिलाही प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेत सहभागी अबाल वृद्ध स्पर्धकांचा उत्साह आणि ते आपल्या पाल्याची कला साकारत असताना कौतुकाने बघणारे पालक या साऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप समाधान वाटल्याचे अंजली चक्रदेव यांनी सांगितले. तर अशा या अभूतपूर्व स्पर्धेत यापुढेही प्रायोजकत्व देऊ व इतर सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन तिन्ही सहप्रयोजकांनी दिले. तसेच भविष्यात याहून मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेण्याकरिता प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंडळातर्फे मंडळाचे उपाध्यक्ष सीए सचिन आंबेकर यांनी सहप्रयोजकांचे, स्पर्धेच्या परीक्षकांचे,सहभागी स्पर्धकांचे, पालकांचे, शाळेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि शिक्षकांचे मंडळातर्फे आभार व्यक्त केले. तसेच टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळाने शाळेचे पटांगण माफक दरात उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.
पहिला गट प्रथम: जुई महाजन (हॉली एंजल स्कूल) द्वितीय: अर्णव साळुंखे (मॉडेल इंग्लिश स्कूल) तृतीय: स्वस्तिक कानडे (ओमकार इंग्लिश स्कूल) उत्तेजनार्थ: श्रिजा मॅटी दुसरा गट: प्रथम: अन्वय जिज्ञेश पवार (आयईएस चंद्रकांत पाटकर विद्यालय) द्वितीय: सान्वी संजय पाटील ( विद्या निकेतन) तृतीय: मनस्वी अनिल जाधव (मॉडेल इंग्लिश स्कूल) उत्तेजनार्थ: विहान हेमंत राजेशिर्के (टिळक नगर विद्यामंदिर) तिसरा गट: प्रथम: सौम्या समीर यादव (IES चंद्रकांत पाटकर विद्यालय) द्वितीय: ज्ञानेश्वरी पांडुरंग मगदूम (IES चंद्रकांत पाटकर विद्यालय) तृतीय: अनय पटवर्धन( विद्या निकेतन) उत्तेजनार्थ: अनुष्का तेलंगे (एस के पाटील इंग्लिश स्कूल) चौथा गट: प्रथम: आर्या साईराज सामंत (IES चंद्रकांत पाटकर विद्यालय) द्वितीय: इशा कृष्णा पाटील (साउथ इंडियन असोसिएशन स्कूल ) तृतीय: मीहीका रवींद्र पाटील ( ग्रीन्स इंग्लिश स्कूल) उत्तेजनार्थ: साईनाथ दिनेश पडवेकर (टिळकनगर विद्यामंदिर) खुला गट: प्रथम: ईशा साईराज सामंत (डॉन बॉस्को स्कूल) द्वितीय: गौरव रवींद्र रासने तृतीय: सुनयना मढव उत्तेजनार्थ: वर्षा परळकर