कल्याणडोंबिवली महानगरपालिकेला अलीकडे एक ना अनेक पुरस्कार प्राप्त होत आहेत. ही आनंदाची बाब असली तरी पालिकेच्या परिवहनच्या बसवर लागलेल्या एका जाहिरातीने सर्वांचं लक्ष वेधलं असून काही नागरिकांनी सोशल मीडियावर याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येतेय. केडीएमटीच्या बसवर आसाराम बापू यांचा फोटो असलेली एक जाहिरात लागल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. या जाहिराती कंत्राटदार लावतो असं स्पष्टीकरण केडीएमसीनं दिलं आहे. मात्र लोकमतनं विचारणा केल्यावर अवघ्या तासाभरात ही जाहिरात गायब झाल्याचं निदर्शनास आलं.
केडीएमटीची MH 05 R 1231 या बसवर एक जाहिरात लावण्यात आली होती. 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. याच पार्श्वभूमीवर आई वडिलांचे पूजन करुन खऱ्या अर्थाने हा दिवस साजरा करावा असं यात लिहिण्यात आलंय. हा संदेश जरी योग्य असला तरी त्याबाजूला लावण्यात आलेला आसाराम बापूचा फोटो आणि अन्य गोष्टी पाहता मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून येत असल्याचं बोललं जातं आहे. यापूर्वी जाहीर कार्यक्रमात आसाराम बापूनं अनेकदा 14 फेब्रुवारी हा दिवस मातृपितृ दिवस म्हणून साजरा करावा असा उपदेश आपल्या भक्तांना दिला होता. आता 14 फेब्रुवारी जवळ येऊ लागल्यानं आसाराम बापूच्या फोटोसह त्याने दिलेल्या संदेशाची जाहिरात केडीएमटीच्या बसवर झळकत आहे. ही जाहिरात सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांचा ठपका ठेवत आसाराम बापूवर कोर्टानं आरोप निश्चित केले होते. यासंदर्भात परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत यांना विचारलं असता जाहिरातीसाठी वार्षिक कंत्राट ठेकेदाराला दिलं जातं. त्यांच्याकडूनच जाहिराती लावल्या जातात. यासंदर्भात माहिती घेऊन तपासली जाईल आणि मग निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं. तसेच बसच्या लोकेशनबाबत विचारणा केली असता एक तास थांबण्याचा सल्ला दिला. त्यानंतर गणेश घाट आगारात ही बस असल्याची माहिती देण्यात आली. आगारात जाऊन बसची पाहणी केली असता या बसवरील जाहिरात गायब झाल्याचं दिसून आलं. या बससह इतर बसवरील जाहिरातीही काढण्यात आल्या अशी माहिती एका कर्मचाऱ्यांनं नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. त्यामुळे आता एका तासात नेमकं काय घडलं असावं? हा चर्चेचाच विषय आहे.