अनिकेत घमंडी, डोंबिवली : सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीच्या गणेश मंदिर संस्थान आयोजित नववर्ष स्वागतयात्रेत पालखी वाहण्याच्या बहुमानाचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्याचे औचित्य साधून विवेकानंद सेवा मंडळ, डोंबिवली पूर्व या संस्थेने सामाजिक बांधिलकी म्हणून हरित डोंबिवली प्रकल्पांतर्गत २५० वृक्ष लागवड आणि संवर्धन उपक्रम हाती घेतला असून त्याचा तिसरा टप्पा रविवारी पार पडला.
त्यानूसार संकल्प बहुउद्देशीय संस्था, कोळेगाव, निळजे येथे ६० स्वदेशी वृक्ष लावण्यात आले. हा वृक्षारोपण सोहळा रोहिणी लोकरे( कार्यकारी अभियंता पर्यावरण विभाग, महानगरपालिका) आणि महेंद्र पाटील (अभियंता, पाटबंधारे विभाग ठाणे व सचिव संकल्प बहुउद्देशीय संस्था निळजे) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. लोकरे यांनी उपस्थित सर्व पर्यावरणप्रेमींना पर्यावरण संवर्धनाची शपथ दिली. प्रगती महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग चे स्वयंसेवक, निसर्गप्रेमी डोंबिवलीकर, विवेकानंद सेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि अन्य व्यवस्थापनांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही वृक्षारोपण सोहळ्यात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल काठे आणि अमेय कुलकर्णी यांनी केले. या हरित डोंबिवली अभियानाकरिता संदीप वैद्य, सुरेखा माधव जोशी आदींनी रोपांकरिता अर्थसहाय्य केले.