अनिकेत घमंडी/ डोंबिवली: पेंढरकर कॉलेज समोरील डोंबिवली रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस नवीन बनविलेला केडीएमटी सेवेच्या बस स्टॉपची अक्षरशः दुर्दशा झाली असून त्यात बसण्यासाठी बसविलेले स्टील बेंच तुटून गेल्याने ते आता चोरीस गेले आहेत. बस स्टॉपचा आत बसविलेल्या लाद्या तुटल्या फुटल्या आहेत. एकंदर हा नवीन बांधलेला बस स्टॉप, निकृष्ट दर्जाचा बांधल्याने त्याचा आता प्रवाशांसाठी उपयोग होताना दिसत नाही याची खंत रहिवासी, दक्ष नागरिक करत आहेत.
या बस स्टॉपचा जास्त वापर कॉलेज, शालेय विद्यार्थी आणि वरिष्ठ नागरिक करीत होते. आता ते सर्व उन/पावसात उघड्यावर बसची वाट पाहत असतात. एमआयडीसी मधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करते वेळी जे जुने बस स्टॉप होते ते तोडले गेले गेल्याने तेथे नवीन बस स्टॉपची आवश्यकता होती. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी हे बस स्टॉप फक्त काही ठिकाणी बांधण्यात येऊन त्याचे श्रेय काही राजकीय पुढाऱ्यांनी तेव्हा घेतले होते अशी टीका दक्ष नागरिकांनी केली. महत्त्वाचा असा मिलापनगर बस स्टॉप मात्र लोकांची मागणी असूनही आणि पत्र देऊनही जाणूनबुजून बांधला गेला नाही. इतरही ठिकाणी बांधलेले नवीन बस स्टॉपची अशीच कमी अधिक प्रमाणात दुर्दशा झाली असून केडीएमटी आणि केडीएमसी प्रशासनाने याची काही गॅरंटी ठेकेदार कडून घेतली होती का ? हे बस स्टॉप आता पुन्हा बांधण्यात येणार आहेत का, किंवा त्याची दुरुस्ती होणार आहे का ? निव्वळ जनतेचा पैशाची उधळपट्टी केली गेली आहे. केवळ चार महिन्यांतच या बस स्टॉपची दुर्दशा झाल्याने यात भ्रष्टाचार झाला असेल तर याची रीतसर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करायला हवी: राजु नलावडे