डोंबिवली: ‘सायेब बॅनरवं दिसतान भारी’ ही प्रत्यक्ष विकास न करता फक्त बॅनरबाजी करणाऱ्या नेत्यांना, साहेबांना चपराक असणारी कविता कवी किरण पाटील यांनी सादर करून समाजातील वास्तव मांडले आहे. निमित्त होते आगरी युथ फोरम डोंबिवलीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आगरी महोत्सवातील कवी संमेलनाचे.
१८ व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवात ‘आगरी बोली कवी संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. यामध्ये कवी पुंडलिक म्हात्रे, जयंत पाटील, रामनाथ म्हात्रे, राजश्री भंडारी, किरण पाटील, निलेश म्हात्रे, संदेश भोईर, श्याम माळी सहभागी झाले होते. या संमेलनाचे समन्वयक संदेश भोईर हे होते. यावेळी गुलाब वझे, पांडुरंग म्हात्रे, शरद पाटील यांच्या हस्ते कवींचा सन्मान करण्यात आला.
कवी पुंडलिक म्हात्रे यांनी ‘आमाला कामाला लावाला हरकत काय तुमची’ ही प्रकल्पग्रस्थांची व्यथा मांडणारी कविता सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. जयंत पाटील यांनी ‘आगरान माझे जमीन कष्टाची तुला सांभालाची भूमिपुत्र’ हा अभंग सादर करून सर्व वातावरण भक्तीमय केले. रामनाथ म्हात्रे यांनी ‘हलद होती वाळ्य़ाची न पोर पटवली काळ्य़ाची’ , राजश्री भंडारी यांनी ‘लगीन आयलाय पोरीचा’, निलेश म्हात्रे यांनी ‘बायको गेली माहेरी’, संदेश भोईर यांनी ‘आमचे गावरान एकीच नय’, श्याम माळी यांनी ‘आमचा यो बाल्या फ्री ङोतंय’ या कविता सादर केल्या.