लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण: उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी कल्याण डोंबिवली शहरातील १६३ सार्वजनिक मंडळाचे आणि १० हजार ९५ घरगुती अशा १० हजार २५८ गणपतींचे विसर्जन होणार आहे. विसर्जनाच्या वेळी वाहतूककोंडी होवू नये व विसर्जन प्रक्रिया सुरळीत व्हावी या दृष्टीकोनातून केडीएमसी, वाहतूक आणि शहर पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील गणेशघाट विसर्जनासाठी सुसज्ज ठेवले असताना ऑन कॉल विसर्जन , कृत्रिम तलाव आणि विसर्जन आपल्या दारी आदि उपक्रम देखील मनपाकडून राबविले जाणार आहेत.
कल्याणमध्ये ३२ तर डोंबिवली ३७ विसर्जनस्थळे आहेत. दुर्गाडी, जुनी डोंबिवली, कुंभारखाणपाडा, मोठा गाव ठाकुर्ली यासह अन्य गणेशघाट विसर्जनस्थळांसह शहर आणि ग्रामीण भागातील तलाव अशा २३ ठिकाणी मनपाकडून गोताखोर आणि स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कुंभारखाणपाडा, दुर्गाडी आणि मोठा गाव ठाकुर्ली अशा मोठ्या विसर्जन गणेशघाटांच्या ठिकाणी इंजिन रबर बोट देखील ठेवली जाणार आहे. ६९ विसर्जन स्थळांच्या ठिकाणी ६७ जनरेटर, २ हजार ४५५ हॅलोजन, ८८ टॉवर आणि सुरक्षेसाठी १६८ सीसीटिव्ही कॅमेरे लावले गेले आहेत. तर दोन्ही शहरात मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये २ हजार १७० सीसीटीव्ही कॅमेरांची करडी नजर राहणार आहे.
विसर्जनाच्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून वाहतूक आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून पोलिस अधिकारी, होमगार्ड, एसआरपीच्या तुकडया विसर्जनादरम्यान ठिकठिकाणी तैनात राहणार आहेत. वाहतूककोंडी होवू नये म्हणून अवजड वाहनांना बंदी घालण्याबरोबरच कल्याण शहरातील वाहतूकीत बदल देखील करण्यात आले आहेत. काही ठिकाणी एकदिशा मार्गाने वाहतूक चालविली जाणार आहे. त्याचे पालन वाहनचालकांसह गणेशभक्तांनी करावे असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.