मुरलीधर भवार-कल्याण: तहसील कार्यालयात बनावट कागदपत्रे सादर करत कल्याणमधील शिवकालीन किल्ले दुर्गाडीच्या जागेवर दावा सांगणाऱ््यास कल्याण महात्मा फुले पोलिसांनी अटक कली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सुयश शिर्के सातवाहन असे आहे.
दुर्गाडी शिवकालीन आहे. किल्ले दुर्गाडी हा ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत आहे. सुयश शिर्के सातवाहन याने कल्याण तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. किल्ले दुर्गाडी असलेल्या जमीनीच्या उताऱ्यावर ना हरकत दाखल मागितला होता. शिर्के सातवाहन याने सादर केलेली कागदपत्रे ही साक्षांकीत आणि नोंदणीकृत नसल्याचे दिसून आले. तसेच अधिकची तपासणी आणि छाननी केली असता शिर्केची कागदपत्रे ही संशयास्पद, बनावट आणि बोगस असल्याचे तहसील प्रशासनाच्या निदर्शनास आले . याप्रकरणी कल्याण तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रिती गुडे यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांनी या प्रकरणी शिर्के याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता.शिर्के याला पोलिसानी नवी मुंबई येथून अटक केली आहे. त्याच्याजवळून बनावट स्टॅम्प देखील जप्त करण्यात आले आहेत असे पोलिसांनी सांगितले.