डोंबिवली: घरफोडीच्या गुन्हयातील सराईत चोरटा राजेश अरविंद राजभर याला मानपाडा पोलिसांनी उत्तरप्रदेश आझमगड कंजहीत रायपूर येथून अटक केली. राजभर याच्यावर याआधी घरफोडीचे तब्बल २२ गुन्हे दाखल असून पोलिसांच्या तपासात आणखीन ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून २१ लाख २६ हजार ६०० रूपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष बाब म्हणजे अनेक पोलिस ठाण्यांच्या रेकॉर्डवर असलेल्या राजभरला पकडण्यासाठी त्याच्या गावी जाऊन मानपाडा पोलिसांनी वीटभट्टीवर मजूराचा पेहराव केला होता.
डोंबिवली पूर्वेकडील देसलेपाडा परिसरात राहणा-या ओमकार भाटकर यांचे बंद घर फोडून चोरटयाने सोने चांदिचे दागिने लंपास केल्याची घटना भरदिवसा ३० ऑगस्टला घडली होती. दरम्यान या गुन्हयाच्या तपासकामी डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे आणि मानपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके नेमली होती. गुप्त बातमीदाराने दिलेली माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला अट्टल घरफोडया चो-या करणारा आरोपी राजेश राजभर यानेच हा गुन्हा केल्याचे समोर आले. त्याच्या ठावठिकाणाबाबत गोपनीय माहीती मिळवली असता सध्या अंबरनाथ येथे राहणारा राजेश हा त्याच्या मुळगावी उत्तरप्रदेशमधील आझमगड जिल्हयातील कंजहित रायपूर याठिकाणी आपले अस्तित्व लपवून राहत असल्याचे समजले.
पोलिसांची पथके त्याठिकाणी मार्गस्थ झाली. राजेशच्या येण्याजाण्याच्या मार्गाची माहिती काढुन त्यामार्गावर असलेल्या वीटभट्टीच्या ठिकाणी पोलिसांनी तेथील मजूरांचा वेश परिधान करून सापळा लावला. आरोपी राजेश दुचाकीवरून येताना दिसताच मजूरांचा वेश पेहराव केलेल्या पोलिसांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याला थांबविले आणि ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत मानपाडा हद्दीतील चार, महात्मा फुले चौक, पनवेल आणि अर्नाळा सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक असे सात घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. राजेशचा त्याच्या गावी आलिशान बंगला आणि महागडया गाडया असल्याची माहीती देखील तपासात समोर आली आहे.