भिवंडी : पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ क्षेत्रातील भिवंडी शहर,भोईवाडा,निजामपुरा,शांतीनगर,नारपोली व कोनगाव या सहा पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या ऑल आऊट कारवाईत गावठी कट्टा व तलवार बाळगणारे चार व वेगवेगळ्या गुन्ह्यात हवे असलेले गुन्हेगार असे एकूण १९ जणांना अटक करीत १७४ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून या वाहनातून ८४ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
शहरात रात्री ११ ते पहाटे ४ वाजता दरम्यान ४० अधिकारी व १८० अंमलदार यांच्या मदतीने हे अचानक ऑल आउट ऑपरेशची कारवाई करण्यात आली.या दरम्यान सहा ठिकाणी नाकाबंदी लावुन ४३८ संशयीत वाहन तपासुन त्या पैकी १७४ वाहनांवर ८४ हजार ९०० रुपयांची दंडात्मक करवाई करण्यात आली. विविध गुन्हयात पाहिजे असलेल्या ४६ गुन्हेगारांचा कसुन शोध घेवुन त्यापैकी ३ आरोपींना अटक करण्यात आली.तर रेकॉर्ड वरील ९५ गुंड व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.संशयीत इसमांचा शोध घेण्या करीता ५३ हॉटेल, बार,लॉज यांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये एक गावठी कट्टा आणि तलवार, सुरा बाळगणारे ३ असे एकुण ४ इसमांना अटक करण्यात आली आहे.
दारुबंदी कायदया अंतर्गत अवैध्य दारु बाळगणारे व विकणारे अशा १५ जणांविरोधात नोटीस बजावून गुन्हे दाखल करण्यात आले.तर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये एकूण ५ गुन्हे दाखल करीत दहा जणांविरोधात कारवाई करण्यात आली.अमली विरोधी कायद्यांन्वये नशेची अमली पदार्थ बाळगणारे एक व सेवन करणारे ३२ असे एकुण ३३ इसमांवर कारवाई करण्यात आली.यामध्ये एकास अटक करण्यात आली आहे.त्याच प्रमाणे तंबाखुजन्य पदार्थ साठा व विक्री करणारे एकूण ११५ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे.प्रलंबीत वॉरन्टची बजावणी कारवाई करताना जामीनाचे १२ व गैर जामीनाचे सहा असे एकूण १८ जणांवर वॉरन्टची बजावणी करण्यात आली.तसेच हददपार आदेशाचे उल्लंघन करुन शहरात आलेल्या ७ इसमांवर मपोका कलम १४२ अन्वये कारवाई करण्यात आली.तर दोन इसमांना सीआरपीसी १५१ (१) नुसार ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर कारवाईत १९ गुन्हेगारांना प्रत्यक्ष अटक करण्यात आली असुन ३८ गुन्हेगारांना नोटिस देवुन गुन्ह्यांचा तपास सुरु करण्यात आला आहे. या संपूर्ण कारवाईत ३१ हजार ६५० रुपयांचा गावठी कटटा व दोन काडतुस,६५० रुपयांचे चाकु, सुरे,त्याचप्रमाणे ८ हजार २२० रुपयांची ५४ बाटल्या देशी दारु,६२ लिटर हातभटटीची दारू व ४ हजार ४०० रुपयांची जुगारचे साहित्य असा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. ३१ डिसेंबर रोजी नववर्ष आगमन निमित्ताने भिवंडी पोलिस परिमंडळ हददीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असुन शहरातील सर्व नागरीकांनी नववर्षर्षाचे आगमन नियमांचे पालन करुन आनंदाने साजरे करावा असे आवाहन पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी केले आहे.