लोकमत न्यूज नेटवर्क : डोंबिवली
सांस्कृतिक डोंबिवलीमध्ये दिवाळी सण म्हटलं की, दिवाळी पहाट कार्यक्रम व फडके रोडवर जमणारी तरुणाई हे चित्र डोळ्यासमोर येतं.गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्यानं कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम झाले नाही. यंदा कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आल्यानं तरुणाईन फडके रोड गजबजणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोणीही फडके रोड व इतर ठिकाणी एकत्र येऊ नये अशी सूचना देत पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.त्यामुळे दिवाळी पहाटसह इतर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यासंदर्भात शहरात ठिकठिकाणी फलकबाजी करत नागरिकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
दरवर्षी डोंबिवलीतील श्री गणपती मंदिरात श्री गणेशाचे दर्शन घेऊन त्यानंतर मित्र मैत्रिणी व आप्तस्वकीयांसोबत दिवाळी साजरी केली जाते. कोरोनामुळे यावर्षीही फडके रोड व इतर परिसरात तरुणाईच्या गर्दीने फुलणार नसल्याने अनेकांचा हिरमोड झालाय. मंदिर खुली झाली असल्यानं गणरायचं दर्शन घेण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिवाळी दरम्याण जमावबंदीचा आदेशाचं उल्लंघन केलं तर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्यानं गुरुवारी शहरात नेमकं कसं चित्र असेल? हे पाहावं लागणार आहे.