उल्हासनगर : कलानी महल मध्ये घुसून रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी राडा केल्याच्या पाश्वभूमीवर त्यांच्यात पुन्हा राडा होऊ नये म्हणून पोलिसांनी शहरातून रूट मार्च काढण्यात आला. तसेच परस्पर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्या अटकेसाठी पोलीस पथके तैनात झाली आहे.
उल्हासनगरात गुरवारी रात्री रिपाईचे शहरजिल्हाध्यक्ष भगवान भालेराव व राष्ट्रवादीचे पक्ष प्रवक्ता कमलेश निकम यांच्यात एका व्हाट्सअप ग्रुपवर वाद झाला. त्यानंतर काही मिनिटात रिपाईचें कार्यकर्ते व भालेराव यांचे मेहुणे आकाश सोनावणे हे मित्रांसह माजी आमदार पप्पु कलानी यांच्या कलानी महल मध्ये घुसून कमलेश निकम यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आकाश सोनावणे यांच्यासह इतरांना चोप दिला. याप्रकारने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. असंख्य नागरिक कलानी महल व उल्हासनगर पोलीस ठाण्या समोर एकत्र आले होते. पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून कलानी महल येथे पोलीस बंदोबस्त वाढविला आहे.
उल्हासनगर पोलीस ठाण्यात कमलेश निकम व आकाश सोनावणे यांच्यावर परस्पर गुन्हे दाखल झाले. रिपाइंचे शहरजिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांचे मेहुणे व रिपाईचें कार्यकर्ते आकाश सोनावणे यांच्यासह तिघांवर मीरा हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यावर केंव्हाही अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यांची धडपकड झाल्यास शहरात अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी रूट मार्च काढण्यात आला. मात्र कलानी व भालेराव यांच्यातील वादाने पुन्हा हाणामारीची शक्यता शहरात व्यक्त होत आहे. दरम्यान पोलिसांच्या रूट मार्चने गुन्हेगारांच्या मध्ये धडकी भरली असून गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी रूट मार्च काढल्याचे बोलले जात आहे.