मुरलीधर भवार कल्याण : लोकसभा मतदार संघात उद्धव सेनेचे रमेश जाधव यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समोर महाविकास आघाडीने वैशाली दरेकर यांनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर जाधव यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याने मतदार संघात राजकीय ट्वीस्ट निर्माण झाला आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघात राज्यातील ४८ मतदार संघापैकी ही सगळ्यात बिग फाईट आहे. हा मतदार संघ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा मतदार संघ आहे. शिवसेने्च्या फूटीनंतर कल्याण लोकसभा मतदार संघातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामिल झाले. लोकसभा निवडणूकीत खासदार शिंदे यांच्या समोर काेण उभे राहणार ? याची चर्चा सुरु होती. निवडणूकीच्या घोषणा झाल्यावर खासदार शिंदे यांच्या समोर महाविकास आघाडीने दरेकर यांना उमेदवारी दिली. त्यांनी प्रचार ही सुरु केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी महापौर आणि उद्धव सेनेचे पदाधिकारी रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
जाधव यांनी सांगितले की, मला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन करुन अर्ज भरण्यास सांगितले आहे. एबी फा’र्म दिलेला नाही. सहा तारखेला एबी फा’र्म बद्दल माहिती मिळेल. दरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला त्याच्या अर्जात त्रूटी असल्यास पर्यायी अर्ज असावा म्हणून अर्ज दाखल केला आहे. दरेकर यांच्या विषयी नाराजी असल्याने अर्ज भरला आहे का अशी विचारणा जाधव यांच्याकडे केली असता त्यांनी त्याबद्दल मला माहिती नाही असे त्यांनी सांगितले.
त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या ६ मे रोजी खरे चित्र स्पष्ट होणार आहे. या संदर्भात दरेकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पक्ष प्रमुखांच्या आदेशानंतर कार्यकर्ते पदाधिकारी काम करीत असतात. पक्षाच्या आदेशानुसार मी पक्षाची अधिकृत उमेदवार असून मी अर्ज भरलेला आहे. पक्षाची रणनिती असते. त्यानुसार जाधव यांनी अर्ज भरला आहे. माझ्यावर कोणताही दबाव नाही. त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच नाही. ४ जूनला निकालनंतर मशाल संसदेत पोहचणार हे निश्चीत आहे.