कल्याण : डाक विभाग असंघटित मजुरांसाठी खूप चांगले काम करत आहे. सध्या असंघटित मजुरांसाठी ३९६ रुपयांच्या वार्षिक विम्याची तरतूद करण्यात आली आहे. पोस्ट विभागाशी संबंधित भारत सरकारच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे ठाणे मध्य विभागाचे प्रवर डाक अधीक्षक डॉ. संजय लिये यांनी येथे सांगितले.
टपाल विभागातर्फे पश्चिमेकडील टिळक चौक परिसरात असलेल्या कॅ. ओक शाळेच्या सभागृहात 'आर्थिक सक्षमीकरण दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी, डॉ. लिये यांनी उपस्थितांना टपाल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, माजी नगरसेवक वंदना गिध, बालक मंदिर संस्थेचे अध्यक्ष मयुरेश गद्रे, मुख्याध्यापिका कल्पना पवार आदी उपस्थित होते.
पोस्ट कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमात पीपीएफ आणि सुकन्या योजनेंतर्गत खाती उघडल्यानंतर ५५० शाळकरी मुलांना पासबुकचे वाटप करण्यात आले. यादरम्यान कल्याण मुख्य पोस्ट कार्यालयाच्या वतीने आयोजित विविध उपक्रमांमध्ये प्रशंसनीय काम करणाऱ्या कर्मचारी व एजंटांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व पाहुण्यांनी टपाल विभागाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कल्याण मुख्य पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्तर अशोक सोनवणे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपपोस्ट मास्तर माया सगरिया यांच्यासह पोस्ट विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.