डोंबिवली: येथील।कस्तुरी प्लाझा इमारतीजवळील रोहित्राजवळ टाकलेल्या कचऱ्याला शुक्रवारी आग लागल्याने डोंबिवलीतील काही भागाचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. यातून महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेसोबतच आर्थिक नुकसान झाले. तर या वाहिनीवरील ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. कस्तूरी प्लाझा येथे रोहित्राजवळ साठलेल्या कचऱ्याला शुक्रवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास आग लागली.
यात २२ केव्ही बाजीप्रभूकडून येणाऱ्या व डोंबिवली पश्चिमेतील कोपर रोड, नवापाडा तसेच डोंबिवली पूर्वेतील नालंदा व तुकारामनगरकडे वीज वाहून नेणाऱ्या उच्चदाबाच्या वाहिन्या जळून खाक झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर नवापाडा वगळता इतर तीन भागांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने तातडीने सुरू करण्यात आला. तर दुरूस्ती सुरू असतानाच पर्यायी मार्ग उपलब्ध करून नवापाडा भागातील गणेश नगर, शंकेश्वर, कुंभारखाण पाडा, कुबेर समृद्धी, बावनचाळ, रेल्वे ग्राऊंड भागाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. यात स्थानिक नागरिकांसह मनपाच्या अग्निशमन विभागाची महावितरणला मोलाची मदत झाली. आगीमुळे जळालेल्या केबल बदलण्यास दिवसभराचा लागलेला कालावधी, दुरुस्तीचा खर्च आणि वीज विक्रीचे नुकसान असा तिहेरी फटका महावितरणला बसला.
तर संबंधित भागातील ग्राहकांनाही वीजपुरवठा खंडित झाल्याने त्रास झाला. वीज वितरण रोहित्र, फिडर व मिनी पिलर, वीजवाहिन्या असलेल्या ठिकाणी कचरा टाकू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. जेणेकरून आगीसारख्या घटना व यातून उद्भवणारे नुकसान टाळता येतील असे आवाहन महावितरणने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले. असे प्रकार आढळल्यास तातडीने महावितरणच्या स्थानिक कार्यालयांना कळवावे अशी सूचनाही करण्यात आली.