कल्याण-जगातील सर्वात उंच शिखर म्हटले की, आठवते माऊंट एव्हरेस्ट. पण हिमालयाच्या पर्वत रांगेतील माऊंट एव्हरेस्ट हे उंच शिखर असले तरी जगातील सर्वात उंच शिखर हे दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथे आहे. त्याचे नाव स्टॅंड अलोन माऊंट किलीमांजारो असे आहे. हे शिखर कल्याणचा तरुण प्रशिल अंबादे याने सर करुन नव्या विक्रमाची नोंद केली आहे. या शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १९ हजार ३४० फूट इतकी आहे.
महाराष्ट्राचा बेअर ग्रिल्स म्हणून गिर्यारोहक प्रशिल अंबादे याची ओळख आहे. प्रशिल हा मूळचा विदर्भातील चंद्रपूर येथील रहिवासी आहे. सध्या २ वर्षापासून सह्याद्री डोंगर रांगेची भटकंती करत आहे. लहानपणापासून इतिहास विषयाची आवड आणि ट्रेकिंग चा छंद असल्याकारण साध्या सोप्या भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास लोकांपर्यन्त यु ट्यूब च्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करत आहे.
गेल्या २ वर्षात २०० हून अधिक गड किल्ले प्रशिलने सर केले आहेत. प्रशिलने कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या गिर्यारोहक संघा सोबत सह्याद्रीतील वजीर सुळका , वानरलिंगी सुळका , नवरा नवरी सुळका , अलंग मलंग कुलंग यांसारखे अनेक कठीण समजल्या जाणाऱ्या ठिकाणी गिर्यारोहक केले आहे. गिर्यारोहणाच्या ऍडव्हेंचर प्रशिलने लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले आहे.