डोंबिवली - मध्य रेल्वेच्या लोकल सेवेचा खोपोली व कसाऱ्यापर्यंत विस्तार झालेला आहे. यातील बहुतांश एमएमआरडीए क्षेत्रात येत असून दिवा, डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली, कल्याण, विट्ठलवाडी, उल्हासनगर,अंबरनाथ, बदलापूर, शहाड, आंबिवली, टिटवाळा, आसनगाव, कल्याण, दिवा, कर्जत, कसारा ही मोठी जंक्शन या क्षेत्रात येतात. या एमएमआरडीए क्षेत्रातील रेल्वे स्थानकांचा समग्र विकास आराखडा तयार करावा अशी मागणी आमदार राजू पाटील यांनी २०२१ मध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती, त्याला रेल्वेने मंजुरी देत मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा या स्थानकांचा विकास होणार असल्याने पाटील यांनी दानवेंसह रेल्वेचे जाहीर आभार मानले.
पाटील म्हणाले की, त्यांनी तेव्हा दिलेल्या निवेदनात म्हंटले होते की, मुंबई-ठाणे येथील विस्ताराला मर्यादा आल्यानंतर पर्याय म्हणून या परिसराला अधिक महत्त्व आलेले आहे. त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मोठमोठे गृहसंकल्प, नवीन कंपन्या, एमआयडीसी, शैक्षणिक संस्था या परिसरात विस्तारत वरील स्टेशनच्या माध्यमातून जवळपास २० लाख प्रवासी रोज ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरात नोकरी व्यवसायानिमित्त प्रवास करतात. परंतु यातील बहुतांश स्थानकांची अत्यंत दुरावस्था झालेली असून अगदी प्राथमिक सोयी-सुविधाही उपलब्ध नसल्याचे दिसून येते. त्यामुळे महिला, विद्यार्थी व नोकरी व्यवसायानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होतात.
मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रात ही सर्व स्थानके येत असल्याने अत्याधुनिक सोयी-सुविधायुक्त करण्याची आवश्यकता होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याने लाखो प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे ते म्हणाले. त्यानुसार दानवे यांनी लक्ष घालून या परिसरातील वाढत्या प्रवाशांना सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्व स्थानकांचा विस्तार करुन नियोजित आराखडा तयार करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली होती, त्यानुसार बहुतांशी स्थानकांचा समावेश करण्यात आल्याबद्दल पाटील यांनी रेल्वेचे आभार मानले आहेत.