डोंबिवली : सर्व प्रभागांमध्ये निवडणुक लढण्याची तयारी करा; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचाही स्वबळाचा नारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 07:41 PM2021-09-05T19:41:30+5:302021-09-05T19:42:17+5:30
रविवारी पार पडलेल्या बैठकीत देण्यात आले निर्देश. वरिष्ठांचा निर्णय येण्याची वाट पाहू नका स्वबळावर केडीएमसी निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने तयारी ठेण्याच्या सूचना.
डोंबिवली: काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी घेतलेल्या बैठकीनंतर केडीएमसीची निवडणूक स्वबळावर लढण्याच्या सूचना स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादीनेही आता स्वबळाचा नारा दिला आहे. मनपाच्या सर्व प्रभागांमध्ये निवडणुक लढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करा असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना रविवारी केले.
केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागांमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत आहेत. रविवारी कल्याण पश्चिमेतील रामदासवाडीत पार पडलेल्या मेळाव्यात शिंदे बोलत होते. यावेळी नुकतीच जिल्हा निरिक्षकपदी नियुक्त झालेले स्थानिक नेते प्रमोद हिंदूराव देखील उपस्थित होते. मार्गदर्शन करताना शिंदे यांनी शहरातील स्थानिक समस्यांवरही प्रहार केला. आजही बीएसयुपीतील घरे नागरीकांना मिळालेली नाहीत. त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. अनेक भागांमध्ये स्वच्छता होत नाही, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे याकडे लक्ष वेधले. सर्वच्या सर्व प्रभागांमध्ये निवडणुक लढविण्याची आपली तयारी सुरू आहे त्यादृष्टीने प्रभागांमध्ये मेळावे घेतले जात आहेत. वरिष्ठांचा निणर्य येण्याची वाट पाहू नका स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने तयारी ठेवा असे शिंदे यावेळी म्हणाले.
"शिवसेनेने ठेका घेतला आहे का"
आपल्या पक्षासह काँग्रेस आणि शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार आहे. परंतु विकासकामांचे बोर्ड कोणाचे लागतात ते फक्त शिवसेनेचे. शिवसेनेने काय ठेका घेतला आहे का? आपण त्यांना हे का करून द्यावे. विकास कामांच्या बाबतीत स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा करून आपण सांगितले पाहिजे. आपली कामे निदर्शनास आणून ती करून घेतली पाहिजेत, आपण केलेल्या विकासकामांचे बॅनर शहरभर लागले गेले पाहिजेत असे मत प्रमोद हिंदूराव यांनी व्यक्त केले.