डोंबिवली : ‘शासन आपल्या दारी’ या रविवारी पार पडलेल्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे आमंत्रण महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, विधानसभा प्रमुख आदींना नसल्याने कार्यकर्त्यांत नाराजी आहे. हा सरकारी कार्यक्रम शिवसेनेने हायजॅक केल्याची भावना मित्र पक्षांकडून व्यक्त होत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते, माजी खासदार आनंद परांजपे यांनी याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. एकीकडे महायुती म्हणताना अशा महत्त्वाच्या कार्यक्रमात डावलले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम जिल्हाधिकारी स्तरावरचा होता, सर्वांना आमंत्रण देणे, ही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जे कार्यक्रम केले, त्या सगळ्या ठिकाणी भाजपसह सर्व पक्षनेते, पदाधिकारी आदींना आवर्जून बोलावले होते. भाजपचे मंत्री, शशिकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक सगळे मंचावर होते. - नरेश म्हस्के, प्रवक्ते, नेते शिवसेना
कार्यक्रम ठाण्यात असो, डोंबिवलीत असो वा अंबरनाथमध्ये असो, राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यातील नेता म्हणून मला बोलावणे अपेक्षित आहे. पण, बोलावले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. - आनंद परांजपे, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
भाजपचे जिल्हास्तरावरील सर्व पदाधिकारी, नेते, माझ्यासारखे आमदार, मंत्री आदींना बोलावण्यात येते. स्थानिक पातळीवर निरोप, आमंत्रण गेले होते की नाही, याबाबत मला सांगता येणार नाही. - संजय केळकर, आमदार, भाजप