लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : केडीएमटी उपक्रमात गेली अनेक वर्षे रखडलेल्या पदोन्नतीचा प्रश्न निकाली निघाला आहे. विभागीय पदोन्नती समितीची मान्यता मिळाल्याने उपक्रमातील कर्मचारी संघटनांची वर्षानुवर्षांची मागणी पूर्ण होत आहे. परिवहन समितीच्या पाठपुराव्याने आठ जणांना तब्बल २१ वर्षांनंतर पदोन्नतीचा लाभ अलीकडेच मिळाला आहे.
केडीएमटी उपक्रमाची स्थापना १९९९ मध्ये झाली, परंतु तेव्हापासून कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्याला पदोन्नतीचा लाभ मिळाला नव्हता. परिवहन समितीचे सभापती मनोज चौधरी आणि अन्य सदस्यांच्या ही बाब लक्षात येताच, त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा विषय तातडीने मार्गी लागण्यासंदर्भात व्यवस्थापकांना आदेश दिले होते.
त्याप्रमाणे, जानेवारी, २०२० मध्ये उपक्रमाच्या विभागीय पदोन्नती समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेवर मार्चमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आले होते, परंतु त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावात पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडता आली नाही. अनलॉकमध्ये दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू झाल्यावर अलीकडेच संबंधित कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे पत्रक देण्यात आले.
यातील संदीप भोसले हे २१ वर्षे प्रभारी म्हणून आगार व्यवस्थापकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना उपक्रमाच्या मंजूर रिक्त पदांपैकी आगार व्यवस्थापक पदावर रितसर पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांच्यासह किशोर घाडी (सहायक वाहतूक अधीक्षक), रमेश अंधारे, मुरलीधर बडवे, किशोर धारवणे, संजय घुगे या चौघांना(सहायक वाहतूक निरीक्षक), संजय आंधळे, संदीप पेणकर या दोघांना (वाहतूक नियंत्रक) अशा एकूण आठ जणांना संबंधित पदांवर पदोन्नती देण्यात आली आहे.
सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदनपदोन्नती मिळालेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे सभापती मनोज चौधरी, परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट आणि माजी नगरसेवक अरविंद मोरे यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.