कल्याण - थकीत मालमत्ता करधारकांसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने लागू केलेल्या अभय योजनेतून महापालिकेच्या तिजोरीत काल ३१ डिसेंबर अखेर २०४ कोटी ४८ लाख रुपये जमा झालेले आहेत. अभय योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहता अभय योजनेला येत्या 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिकेने मालमत्ता कराच्या थकबाकीदारांसाठी १५ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत अभय योजना लागू केली होती. या योजनेतून महापालिकेच्या तिजोरीत २०४ कोटी ४८ लाख रुपये जमा झालेले आहे.
अभय योजनेतून किमान १०० कोटी रुपयांची वसूली होईल असा अंदाज आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला होता. त्यांच्या अंदाजापेक्षा दुप्पट रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झालेली आहे. काल ३१ डिसेंबर र्पयत अभय योजनेची अखेरची मुदत असल्याने महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयासह महापालिका मुख्यालयात कराची रक्कम रात्री अकरा वाजेपर्यंत स्विकारली गेली. काल एका दिवसात महापालिकेत ३७ कोटी ७५ लाख रुपये थकबाकीदारांनी भरले.
अभय योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहून महापालिका आयुक्तांनी अभय योजनेला १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अभय योजनेतून कालर्पयत वसूल झालेले २०४ कोटी ४८ लाख रुपये मिळून आत्तापर्यंत एकूण मालमत्ता कराची वसूली ३४१ कोटी ३८ लाख रुपये झाली आहे. गत वर्षीय मालमत्ता कराच्या वसूलीतून डिसेंबर अखेर २१७ कोटी ८४ लाख रुपये जमा झाले होते. यंदा अभय योजनाचा फायदा महापालिकेस झाला आहे. महापालिकेच्या मालमत्ता कर वसूली विभागाच्या हाती आणखीन तीन महिन्यांचा कालावधी आहे.
१५ जानेवारीपर्यंत अभय योजनेला मिळालेली मुदतवाढ या दोन्हीचा फायदा महापालिकेस होणार आहे. महापालिकेची मालमत्ता कराची वसूली ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त वसूलीचे लक्ष्य गाठू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अभय योजनेत संपूर्ण थकबाकीसह चालू वर्षाच्या कराची संपूर्ण रक्कम तसेच व्याजाची २५ टक्के रक्कम एक रक्कमी भरल्यास ७५ टक्के व्याज माफ केले जात आहे. अभय योजनेच्या मुदतवाढीचा लाभ थकबाकीदारांनी घ्यावा असे आवाहन महापालिकेचे मालमत्ता कर वसूलीचे प्रमुख विनय कुळकर्णी यांनी केले आहे.