कल्याण : कल्याण-अतिवृष्टीच्या काळात महापालिका हद्दीतील धोकादायक होर्डिग त्वरीत काढून टाकण्यात यावे असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. तौक्ते वादळाचा फटका कल्याणला बसला होता. त्यावेळी कल्याण शीळ रस्त्यावर चार होर्डिग पडल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यातून दोन जणांना पोलिस व अग्नीशमन दलाने वाचविले होते. तर २२ जण बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे बचावले होते. त्यामुळे आयुक्तांनी उपरोक्त आदेश दिले आहेत.९ ते १२ जून दरम्यान महापालिका परिसरात अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. अतिवृष्टीत नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी महापालिका आयुक्तानी महापालिका अधिकारी आणि अन्य सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. ९ जूनपासून चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्यात याव्यात. अतिवृष्टीच्या काळात तीन दिवस पुरेल इतका डिझेलचा साठा प्रभाग अधिकाऱ्यांनी करुन ठेवावा, जेणेकरुन अतिवृष्टीच्या काळात रुग्णालयांचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास त्याचा फटका व त्रस रुग्णांना सहन करावा लागू नये. जनरेटरची पर्यायी व्यवस्था सुरळीत ठेवावा यासाठी डिझेलचा पुरेसा साठा हवा. महानगरपालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयात विद्युत पुरवठा सतत चालू राहणे आवश्यक असल्यामुळे अतिवृष्टीच्या काळात रिस्टोरेशनची व्यवस्था करणो बाबतच्या सूचना आयुक्तांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना दिल्या.झाडे छाटण्याची कामे करण्यात यावी
जिथे जुनी झाडे पडण्याची शक्यता आहे. अशी झाडे अतिवृष्टीपूर्वीच छाटण्याची कामे करण्यात यावीत असे आदेश उद्यान अधीक्षक संजय जाधव यांना दिले आहेत. सखल भागात पाणी तुंबू नये यासाठी नाले व गटारं प्राधान्याने साफ करावीत. गोविंदवाडी सारख्या अतिसखल भागात अतिवृष्टीने नागरीकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे. या परिसरात म्हशीचे तबले जास्त आहेत. त्यामुळे त्याठिकाणचे तबले रिकामे करण्यात यावे. त्यातील म्हशींची व्यवस्था अन्य ठिकाणी केली जावी. रहिवाशांच्या करिता संक्रमण शिबीरात व्यवस्था करावी. अतिवृष्टीच्या काळात तातडीच्या परिस्थितीसाठी परिवहन विभागाने बसेसची सुविधा नागरीकांसाठी सज्ज ठेवावी असे आदेश परिवहन विभागाचे उपायुक्त दीपक सावंत यांना दिले आहेत. सर्व विभागीय उपायुक्तांनी त्यांच्या प्रभागात भेट घेऊन एकंदर परिस्थितीचा आढावा घ्यावा असे आयुक्तांनी उपायुक्तांना बजावले आहे.