डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीचा दुवा असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी याकरिता भाजपमधील काही मंडळी व शिवसेनेतील काही मंडळी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. चव्हाण हे राज्यातील राजकारण सोडून दिल्लीत गेल्याखेरीज भाजपच्या स्थानिक नेत्यांना विधानसभा निवडणुकीत संधी मिळत नाही, तर कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात शिवसेनेला मोकळीक हवी असेल तर चव्हाण यांच्यासारखा प्रभावशाली नेता दिल्लीत जाणे हेच हितावह वाटत आहे. मात्र, हा निर्णय सर्वस्वी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींवर अवलंबून आहे. तसेच चव्हाण यांची याबाबतची प्रतिक्रिया पुढे आलेली नाही.चव्हाण हे कोकणातून निवडणूक लढवणार अशा चर्चा गेले काही दिवस माध्यमात रंगत असतात. चव्हाण यांनी २००९ पासून डोंबिवली विधानसभेवर आतापर्यंत ३ वेळा स्वतःच्या एकहाती विजयाची मोहोर उमटवलेली आहे.
भाजप-शिवसेनेतील दबावतंत्र आहे का? - २०१४ च्या युती सरकारच्या काळात त्यांच्या प्रवास करण्याच्या क्षमतेमुळे त्यांना दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री केले होते. शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांसोबत पहिल्या दिवसांपासून ते शिंदे यांच्या शपथविधीपर्यंत चव्हाण हेच होते. आताही शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात त्यांना सार्वजनिक बांधकाममंत्री, सिंधुदुर्ग, पालघरचे पालकमंत्रिपद दिले आहे. - सातत्याने कोकणचा दौरा करून त्यांनी कोकणात भाजपचे जाळे घट्ट केले. परंतु शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी आपले बंधू यांच्याकरिता दावा केला आहे. त्यामुळे चव्हाण यांची उमेदवारी हे भाजप-शिवसेनेतील दबावतंत्र आहे की, खरोखरच चव्हाण यांच्या विजयी होण्याच्या क्षमतेमुळे त्यांना तेथून उभे करण्याचा निर्णय दिल्लीत घेतला जाणार आहे का, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
मी भाजपचा कार्यकर्ता आहे. पक्षात वरिष्ठ नेते निर्णय घेतात, ते जी जबाबदारी देतील ती मी पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. तीच माझी भूमिका असते व राहील.-रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री