कल्याण- रेल्वे प्रशासनाने नेहमीच रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नाकडे कानाडोळा केला आहे. रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडवण्यात रेल्वे अधिकाऱ्यांची उदासीनता दिसून येते. रेल्वे प्रवाशाचे प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वे मंत्री आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी दिला आहे.
रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी बदलापूरमध्ये जागृत रेल्वे प्रवासी परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे अध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष हिंदुराव होते. केंद्र आणि राज्य रेल्वे मंत्र्यांकडे रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी अनेक प्रवाश्यानी आपल्या समस्या मांडल्या. एसी लोकलला प्रवाशांचा विरोध नाही. पण त्याचा मासिक पास हा सर्व सामान्य प्रवाश्यांना परवडणारा असावा, गर्दीच्या वेळेत एसी लोकल सोडू नयेत, रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी साठी रेल्वे प्रशासनाने लोकलमध्ये रात्रीच्या वेळी पोलिस तैनात करावेत, महिलांसाठी स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी. बदलापूरच्या रेल्वे फलाटावरील गर्दी कमी करण्यासाठी यांत्रिक सरकते जिने बांधावेत, अशी मागणी यावेळी जागृत रेल्वे प्रवासी परिषदेचे अध्यक्ष प्रवीण खरात यांनी केली.
मुंबई मंडलात उत्पन्न होणाऱ्या महासुलातील ५० टक्के निधी हा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वळवला जात आहे. त्यामुळे मुंबई रेल्वेचा विकास थांबला आहे. याकडे मुंबई रेल्वे विकास महामंडळ बघ्याची भूमिका घेत आहे. याबाबत आपण रेल्वे मंत्र्यांना जाब विचारणार आहे. तसेच रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण रेल्वे प्रशासनाला धारेवर धरू. रेल्वेने प्रवाशयांचें प्रश्न सोडवले नाहीत तर, रेल्वे रुळावर उतरून आंदोलन करू, असा इशारा उपाध्यक्ष हिंदुराव यांनी यावेळी दिला.