डोंबिवली : रेल्वे प्रवासात विसरलेली लॅपटॉप, अडीच लाख भारतीय रुपये किंमतीचे अमेरिकन डॉलर, डायरी असे सामान असलेली एका महिलेचे बॅग राहिली होती. त्याबाबतची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना मिळाली, त्यावरून ठाकुर्ली यार्डात गेलेल्या लोकल मधील सामानाची बॅग मिळवून देण्यात आरपीएफ डोंबिवली रेल्वे प्रशासनाला यश।मिळाले. ऑपरेशन अमानती अभियान अंतर्गत ही कार्यवाही झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. २१ ऑक्टोबर रोजी रात्री९.२५ वाजेदरम्यान ही घटना घडली. कल्याण महिला रेल्वे पोलीस संजना यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई कल्याण लोकल स्थानकात आल्यानंतर ती ठाकुर्ली यार्डात गेली असून त्या लोकलच्या कल्याण दिशेकडे महिला डब्यात पुर्णिमा मेनोन, 41 रा. ५०३, इमारत नं.१२, विधि कॉम्प्लेक्स, कल्याण मूरबाड मार्ग, योगीधम जवळ, कल्याण पश्चिम यांची वरील ऐवज असलेली बॅग विसरली आहे.
त्यानुसार गाड़ी साइडिंग मध्ये येताच त्या डब्यांची पाहणी करण्यात आली, ऑन ड्यूटी स्टाफ आरक्षक जल सिंह यांनी पाहणी केली, त्यात कोच न. 2053/A मध्ये एक काळ्या रंगची बॅग असल्याचे दिसून आले. त्यांनी ती बॅग डोंबिवली रेल्वे पोलीस दलात जमा केली. महिलेच्या माहितीवरून त्या बॅगेतील सामानाची खातरजमा करून ती बॅग तक्रारदार महिलेला रविवारी कार्यालयात बोलवुन वस्तूची ओळख पटवून देण्यात आली. त्यामध्ये सुमारे ८० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, अडीच लाख रुपये किंमतीचे अमेरिकन डॉलर, टिफिन आदी सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज असलेले सामान होते. आरपीएफ पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे किंमती ऐवज परत मिळाल्याची सकारात्मक भावना व्यक्त करत महिलेने रेल्वे पोलिसांचे आभार मानले.