डोंबिवली - मध्य रेल्वेने मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी मोहीम राबवली, एप्रिल ते सप्टेंबर २०२१ पर्यंत ७१.२५ कोटी रुपयांचे महसुली नुकसान वाचवून अनियमित प्रवासाची १२.४७ लाख प्रकरणे शोधण्यात आली. मध्य रेल्वेत कोविड-१९ च्या संबधित योग्य वर्तनाचे पालन न केल्याबद्दल २५,६१० व्यक्तींना शोधून दंड करण्यात आला. मध्य रेल्वेने, सरकारच्या निर्देशांनुसार कोविड -१९ प्रोटोकॉलचे पालन करताना आणि प्रवाशांना प्रवास करताना सर्व खबरदारी घेण्यास संवेदनशील बनवण्यासाठी, चुकीने वागणाऱ्या प्रवाशाला दंड देण्यास अतिशय तत्पर आणि कुशलतेने काम करीत आहे.
१ एप्रिल २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये विनातिकीट/अनियमित प्रवाशांची एकूण १२.४७ लाख प्रकरणे आढळून आली आणि दंड म्हणून ७१.२५ कोटींची रक्कम वसूल करण्यात आली. सर्व झोनल रेल्वेमध्ये दंडाच्या बाबतीत हे सर्वाधिक आहे.
रेल्वे विभागाने १७ एप्रिल २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत, तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकांनी कोविड-१९ योग्य वर्तनाचे पालन न केल्याच्या एकूण २५,६१० प्रकरणांचा शोध घेऊन दंड केला. मुखपट्टी न घालणाऱ्या प्रवाशांची एकूण २०,५७० प्रकरणे आणि कोविड-१९ मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रवासाला परवानगी नसतानाही प्रवास करणारी ५,०४० प्रकरणे आढळून आली आणि अनुक्रमे ₹ ३४.७४ लाख आणि ₹ २५.२० लाख दंड म्हणून वसूल करण्यात आले.
मध्य रेल्वेने बोनफाईड रेल्वे वापरकर्त्यांना चांगल्या सेवा पुरवण्याच्या आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्याच्या प्रयत्नात नियमितपणे विनातिकीट आणि अनियमित प्रवासाविरोधात तीव्र मोहिमा राबवल्या आहेत. उपनगरी आणि गैर-उपनगरीय / मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सखोल आणि नियमित तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येते जेणेकरून सरकारी मार्गदर्शनांनुसार आणि कोविड १९ प्रोटोकॉलचे पालन करून केवळ बोनाफाईड प्रवासी ट्रेनमध्ये प्रवास करतील.
हेदेखील उल्लेखनीय आहे की, आपली कर्तव्ये पार पाडताना, मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी अत्यंत सौजन्याने आणि चांगल्या वर्तनाचे प्रदर्शन केले ज्यामुळे तक्रारी कमी झाल्या. त्यांनी असंख्य प्रसंगी हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकांसोबत एकत्र करून त्यांचे मानवी दृष्टिकोन दाखवून दिले आहे. गैरसोय टाळण्यासाठी व सन्मानाने प्रवास करण्यासाठी आणि कोविड -१९ साठी अनिवार्य असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यासाठी मध्य रेल्वे, प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे.