कल्याण/डोंबिवली - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेकडे आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन गेल्या महिनाभरापासून राज्यात शाब्दीक गदारोळ माजला आहे. राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेला सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्षपणे विरोधच केला आहे. तर, त्यांची बदललेली भूमिका अनेकांना आश्चर्यचकित करणारी आहे. त्यातूनच, शिवसेनेसह महाविकास आघाडीचे नेते त्यांच्यावर जोरदार टिका करत आहेत. शिवसेनेच्या महिला नेत्या दिपाली सय्यद यांनीही राज ठाकरेंवर आजच्या सभेपूर्वी निशाणा साधला.
राज ठाकरे आजपर्यंत कुठेही विजयी झालेले नाहीत, आता तरी विजयी व्हावेत. आता, तरी त्यांची सभा यशस्वी होऊन त्यानिमित्ताने विजय मिळो, असा चिमटा सय्यद यांनी काढला. कल्याणात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त कल्याणच्या छत्रपती शिवाजी चौकातून न्यू कामगार संघटनेच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उदघाटन दिपाली सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, न्यू कामगार सेनेचे अध्यक्ष समीर पिंपळे, महाराष्ट्र सदस्य हर्षवर्धन साईवाला यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र नांदतात आणि सण साजरे करतात. राज ठाकरेंनी वक्तव्य केल्यानंतर भोंग्याचे जे राजकारण सुरू झाले त्यात राणा दाम्पत्यांनीही उडी घेतली. राजकारण कोण कशासाठी करतोय हे सर्वांना ज्ञात आहे. कोण कोणाची एबीसीडी टिम आहे, हेदेखील माहिती आहे. काही हिंदू जातील राज यांच्याबरोबर तर काही मुस्लिम जातील ओवेसींबरोबर. पण, या राजकारणातून वाद, दंगली होणार आणि सर्वसामान्य नागरीक यात भरडला जाणार. त्यामुळे लोकांनीच विचार केला पाहिजे, असेही दिपाली सय्यद यांनी म्हटले.