कल्याण- गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशीदीवरील भोंगे आणि मदरशासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मनसेतील मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट व्यक्त केली आहे. येत्या दोन दिवसात या संदर्भात मनसेतील मुस्लीम पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन काय निर्णय घ्यायचा हे ठरविण्यात येणार आहे.
मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख हे पक्षाच्या स्थापनेपासून सदस्य आहेत. शेख यांनी मनसे प्रमुख ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. "आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या आज समाजाला सामोरे जाताना जाणीव झाली. १६ वर्षाचा प्लॅशबॅक आठवला आणि डोळ्य़ात पाणी आले." या भावनिक पोस्ट विषयी शेख यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पक्ष प्रमुख ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर पक्षातील कार्यकर्ते आणि समाज प्रश्न विचारु लागला आहे की, पक्षाचे नेमकी भूमिका काय आहे. पक्षात नेमके चालंलय काय?
"विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिमेतून मनसेच्या प्रकाश भोईर यांना मुस्लीम मतदारांनी मतदान केले होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मेहनत घेतली होती. त्यानंतर २०१९ साली कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांना देखील कचोरे, नेतिवली, डायघर विभागातून मुस्लीम मतदान झाले आहे. आता मनसेतील मुस्लीम कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची येत्या दोन दिवसात बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे," असे शेख यांनी सांगितले.
"मशीदीवरील भोंगे आणि त्यावरुन दिली जाणारी बांग यासंदर्भात विशिष्ट डेसिबल, वेळ आणि अंतराची मर्यादा न्यायालयाने ठरवून दिली आहे. समुपदेशनही करता आलं असतं. औरंगाबाद येथे हा प्रयोग करण्यात आला आहे. सौदी येथील राजवटीनेही भोंग्यांची तीव्रता कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लीम न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे वागण्यास तयार होतील. त्यामुळे राज ठाकरे यांनी अशा प्रकारची भूमिका घेऊन समाजाला विश्वात घेऊन या गोष्टी करता आल्या असत्या. समाजाला अंगावर घेण्याची गरज नव्हती," असे शेख यांनी म्हटले आहे.