कल्याण: महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठित खंजीर खुपसला असल्याची टीका शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी केली आहे. यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले की, १९९८ साली शरद पवार यांच्यासोबत मी होतो. शरद पवारांना काँग्रेसने पक्षातून बाहेर काढून टाकले होते. पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला नसून, काँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा खुलासा आठवले यांनी केला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी कल्याणला भेट दिली. यावेळी पत्रकारांसोबत संवाद साधताना आठवले यांनी उपरोक्त खुलासा केला. पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला ही गीते यांची टीका चुकीची असल्याचे केंद्रीय मंत्री आठवले यांनी सांगितले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सव्वा रुपयाचा दावा ठोकणार असल्याचे वक्तव्य केले आहे. याविषयी आठवले यांच्याकडे विचारणा केली असता आठवले यांनी सांगितले की, सध्या आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरु आहे. संजय राऊत हे सत्ताधारी पक्षात आहे. प्रवक्ते, खासदार आणि शिवसेना नेते आहेत. त्यांनी आरोप करण्यात वेळ घालवू नये. त्यापेक्षा विकासाची कामे करण्यावर लक्ष द्यावे असा सल्ला राऊत यांना आठवले यांनी दिला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल सुरु आहे. याविषयी आठवले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, साखर कारखाना चालविण्यास काही एक हरकत नाही. मात्र कारखाना चालवित असताना भ्रष्टाचार करु नये. आर्थिक अनियमितता असता कामा नये. किरीट सोमय्या यांनी अनियमितता आणि भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. त्याचे पुरावे त्यांनी ईडीला सादर केले आहे. चौकशीची मागणी केली आहे. जे लोक भाजपमध्ये गेले आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या मंडळींकडे काही पुरावे असतील त्यांनीही त्यांची प्रकरणो बाहेर काढावीत असे खुले आव्हान आठवले यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केले आहे.
वालधूनी नदीलगत असलेल्या वालधूनी, अशोकनगर परिसरातील नागरीकांना अतिवृष्टीच्या पाण्याचा फटका बसला होता. नागरीकांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी साकेत बहुउद्देशीय विकास संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष सुनिल घेगडमल हे आज उपोषणाला बसणार होते. केंद्रीय मंत्री आठवले या उपोषण स्थली येणार हे कळताच सरकारी यंत्रणा जागी झाली. त्यांनी आठवले यांच्या समोरच घेगडमल यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. तसेच वालधूनी नदीचे पाणी घरांमध्ये शिरु नये यासाठी संरक्षक भिंत बांधण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी देखील पूर्ण करण्याचे आश्वासन नायब तहसीलदारांनी दिले आहे.