डोंबिवली: एकिकडे दुचाकी चोरीचे सत्र सुरू असताना दुसरीकडे एका दुचाकी चोरटयाला अटक करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडुन ७० हजार रूपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. प्रकाश रूपसिंग पुरोहित (वय ३६) असे चोरटयाचे नाव आहे. प्रकाश कोणताही कामधंदा करीत नव्हता त्यात त्याला दारूचे व्यसन जडले होते. त्या व्यसनापायी पैसा कमविण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग अवलंबिल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.
२३ फेब्रुवारीला सकाळी ११.३० ते १२ च्या दरम्यान पुर्वेकडील पी.पी.चेंबर जवळील सिल्वर कॉईन बिल्डींग समोर पार्क करण्यात आलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दुचाकीचालक देवराज बारवडी यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. फुटवेअर व्यावसायिक असलेले देवराज बँकेत काम असल्याने दुचाकीवरून पी.पी.चेंबर जवळ आले होते. त्यावेळी दुचाकी चोरीचा प्रकार घडला. दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना पाहता कल्याण परिमंडळ ३ अंतर्गत येणा-या आठही पोलिस ठाण्यात पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्यावतीने दुचाकी चोरींच्या गुन्हयाच्या तपासकामी विशेष पथके नेमण्यात आली आहेत.
डोंबिवलीतील रामनगर पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे, वरीष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर, पोलिस निरिक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश सानप, पोलिस हवालदार विशाल वाघ, सचिन भालेराव, सुनिल भणगे, तुळशीराम लोखंडे, शिवाजी राठोड, अनिल गवळी, पोलिस नाईक दिलीप कोती आदिंचे पथक नेमले आहे. ज्याठिकाणाहून दुचाकी चोरीला गेली त्याठिकाणचे सीसीटिव्ही कॅमेराचे फुटेज तपासले आणि मागोवा घेतला असता लोढा परिसरातील रसाळ चाळ येथून आरोपी प्रकाश ला ताब्यात घेण्यात आले. त्याने चोरलेली दुचाकी देखील जप्त केली.शनिवारी त्याला अटक करण्यात आली. पोलिस कोठडीनंतर कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने त्याची रवानगी आधारवाडी कारागृहातील न्यायालयीन कोठडीत केली आहे. त्याने आणखीन कुठे चोरीचे गुन्हे केले आहेत का? याचा तपास सुरू असल्याची माहीती सहाय्यक पोलिस निरिक्षक सानप यांनी दिली.