डोंबिवली : रामनगर पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोरटयाला बेडया ठोकल्या आहेत. अनुराग उर्फ गुड्डया विजय अडारी (वय १९) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक बळवंत भराडे, योगेश सानप यांच्या पथकाने ही कारवाई केली.
११ जानेवारीच्या मध्यरात्री पेंडसेनगर भागातून दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दुचाकी मालक दिलीप मराठे यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या गुन्हयाच्या तपासकामी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे आणि वरीष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक बळवंत भराडे, योगेश सानप, पोलिस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, सुनिल भणगे, सचिन भालेराव, शेखर कोळी, पोलिस नाईक हनुमंत कोळेकर, तुळशीराम लोखंडे, शिवाजी राठोड यांचे पथक नेमण्यात आले होते. आरोपी अनुराग हा दुचाकी चोरीच्या गुन्हयातील सराईत असून तो अंबरनाथ येथील राहणारा आहे. त्याच्यावर एकूण १४ गुन्हे दाखल असून यात रामनगर पोलिस ठाण्यासह नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हयांचा समावेश असल्याची माहीती सहाय्यक पोलिस निरिक्षक भराडे यांनी दिली.