अनिकेत घमंडी, डोंबिवली: एमआयडीसी मधील अमुदान ह्या रासायनिक कंपनीत २३मे रोजी नुकत्याच झालेल्या रिएक्टरच्या स्फोटात अनेकांचे बळी गेले असून कित्येकांचे निवारे उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यामुळे एमआयडीसी मध्ये जेवढ्या रासायनिक आणि तत्सम धोकादायक कंपन्या आहेत त्या तातडीने स्थलांतरित करून त्याठिकाणी इंजीनियरिंग अथवा आय टी क्षेत्रातील उद्योग सुरू करावेत. मात्र कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी निवासी इमारती उभारण्यात येऊ नयेत, अशी भूमिका २७ गाव संघर्ष समितीने गुरुवारी घेतली.
ह्या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीने घटना स्थळी भेट देऊन त्या विषयी वरीष्ठ पोलिस निरीक्षक मानपाडा पोलिस स्टेशन आणि कार्यकारी अभियंता एमआयडीसी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.ह्या हादस्यामध्ये मृत आणि जखमी झालेल्या निरापराध कामगारांना तातडीने नुकसान भरपाई देण्याच्या मागणी बरोबरच ज्या समाज बांधवांच्या घरांचे आतोनात नुकसान झालेले आहे,त्यांनाही तातडीने मदत पुरविण्याची मागणी समितीने केलेली आहे.
आपल्या निवेदनाद्वारे समितीने त्या ठिकाणची प्रदुषण नियंत्रण यंत्रणा, बाॅयलर, रिएक्टरचे इन्स्पेक्शन आणि ऑडिट आणि इतर सर्वच सुरक्षा यंत्रणेवर बोट ठेवून त्यावर तातडीने सुधारणा करण्याचे सुचित करून हलगर्जीपणा करणार्या दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची विनंती समितीने केलेली आहे.
त्याचबरोबर ह्या विषयाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात येऊन एकुणच परीस्थितीत सुधारणा घडवून आणण्याबाबत योग्य ती उपाययोजना करण्यात यावी आणि प्रत्यक्षात दोषी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी ठाम मागणी समीतीने शासनासमोर ठेवली आहे. आपल्या मागण्यांच्या अनुषंगाने कार्यवाही होत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी दर पंधरा दिवसांनी संबंधितांची भेट घेतली जाईल असेही समितीने स्पष्ट केले.त्यावेळी समीतीचे गंगाराम शेठ शेलार, गुलाब वझे, गजानन मांगरुळकर, भास्कर पाटील, एकनाथ पाटील, दत्तात्रय वझे, बाळाराम ठाकुर,रतन पाटील, रमाकांत पाटील,बुधा वझे,बंडू पाटील , जालंदर पाटील.जितेंद्र ठाकुर, वासुदेव पाटील आदी संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.