अंबरनाथ: कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर ऑर्डनन्स फॅक्टरीकडे जाणारे रेल्वे रूळ धोकादायक अवस्थेत असल्यामुळे हे रेल्वे रूळ काढण्याचे काम ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. हे रेल्वे रूळ काढल्यानंतर कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील अपघातांची मालिकेला काहीसा ब्रेक लागणार आहे. कल्याण बदलापूर राज्य महामार्गाचे बांधकाम करीत असताना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रवेशद्वारासमोर रेल्वे रूळ आडवे आले होते. मात्र ते रेल्वे रूळ कापण्यास परवानगी न मिळाल्याने संबंधित ठेकेदाराने आहे त्या स्थितीतच रेल्वे रुळावर काँक्रीटचा थर टाकून रस्ता बनवला होता. मात्र ऑर्डर्स फॅक्टरीकडे जाणाऱ्या वळणावर रेल्वे रुळावर जे पेवर ब्लॉक बसवण्यात आले होते ते निघाल्याने हा मार्ग धोकादायक झाला होता.
एवढेच नव्हे तर अनेक दुचाकी स्वार या रेल्वे रुळात अडकून अपघात ग्रस्त झाले होते. यासंदर्भात लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाला जाग आली. त्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र तरी देखील हा धोका कमी होत नसल्याने अखेर ऑर्डर फॅक्टरी प्रशासनाने रेल्वे रूळ कापून हा रस्ता सुस्थितीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये पूर्वी मालगाडीने संरक्षण विभागाला लागणारे साहित्याची वाहतूक केली जात होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून मालगाडीचा वापर बंद झाल्याने हे रेल्वे रूळ तसेच पडीक अवस्थेत होते. त्यामुळे हे रेल्वे रूळ कायमस्वरूपी काढून टाकण्याची मागणी आता पुढे येत आहे. तर दुसरीकडे कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर ऑर्डनन्स फॅक्टरीनेच पुढाकार घेऊन रेल्वे रूळ कापल्याने वाहन चालकांनी समाधान व्यक्त केला आहे