डोंबिवली - २७ गावांत पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत असून लोकप्रतिनिधी नागरिकांना उत्तर देऊन हैराण झाले आहेत. एमआयडीसी, महापालिका या यंत्रणांनी खोटी आश्वासन देऊन वेळ मारून नेऊ नये. तातडीने त्यावर उपाय योजना काढून समस्या मार्गी लावायला हवी. बारवी धरणात आता पुरेसा पाणीसाठा आहे, त्यामुळे पाणी नाही हे कारण ऐकून घेतले जाणार नाही. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यामध्ये लक्ष घालून समस्या तात्काळ सोडवावी अशी मागणी आमदार रवींद्र चव्हाण यांनी देसाईंकडे केली. सोमवारी चव्हाण यांनी एमआयडीसीच्या डोंबिवली येथील कार्यालयात कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांची भेट घेतली, त्यावेळी २७ गावातील पाणी समस्येवर चर्चा झाली. आणखी दीड वर्ष कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असून त्यानंतर जलवाहिन्याची नवनिर्मिती तसेच अन्य टॅपिंगची कामे झाली की पाणी वितरण सुरळीत होईल असे अधिकारी कसे काय सांगू शकतात? असा सवाल चव्हाण यांनी उद्योगमंत्री देसाई यांना केला. त्यांनी मोबाइलवरून या समस्ये संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.
मुबलक पाणी असून २७ गावांत मिळत नाही हे गंभीर आहे असे ते म्हणाले. महापालिका आणि एमआयडीसी या दोन्ही यंत्रणांनी आपापसांत चर्चा करा, समन्वय समिती नेमा, निधी नसेल तर जिल्हा नियोजन समितीत असलेल्या निधीचा वापर करा. जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांना त्याबाबत विचारणा करून त्यांचे मार्गदर्शन घ्या पण समस्या तात्काळ सोडवा असे चव्हाण म्हणाले. एखादी महिला नगरसेवक आत्मदहन इशारा देते यावरून पाणी समस्या किती गंभीर असेल याचा विचार होणे गरजेचे असून पाणी समस्या तात्काळ मार्गी लावा असे ते।म्हणाले. त्यावेळी माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, अमर माळी, जालिंदर पाटील, निलेश म्हात्रे, विशू पेडणेकर, नंदू परब, नंदू जोशी, मनीषा राणे आदींसह कार्यकर्ते त्यावेळी उपस्थित होते.
१०० टँकरने सर्वत्र गावांमध्ये पाणी पुरवठा करण्यात यावा असे चव्हाण म्हणाले. पाणी सगळ्यांना मिळायला हवं याचे नियोजन करा. त्या टँकरचे मूल्य कोणाकडून घेऊ नका. त्यासाठी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करू शकतील. मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करून समस्या निकाली येऊ शकते तर इथं का नाही? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.