लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी रुग्णसंख्या दुपटीने वाढली. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आरोग्य व पोलीस प्रशासनाची तातडीची बैठक घेऊन, काही निर्बंध तत्काळ प्रभावाने लागू केले. या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
या बैठकीस आरोग्य खात्याच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार आदी उपस्थित होते. या बैठकीपश्चात निर्बंध जाहीर करण्यात आले. महापालिका हद्दीत आजमितीस १२०० रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी ३०० रुग्णांचे घरीच विलगीकरण केले आहे. त्यापैकी बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. त्यांच्यावर हेल्थ केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. गंभीर स्वरूपाचे रुग्ण हे तुलनेने कमी आहेत. मास्क न घालता फिरणाऱ्यांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई सुरू आहे. मात्र, तरीही लोक विनामास्क फिरत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. अशातच रुग्णांची संख्या वाढतेय, ही चिंतेची बाब असल्याने काही कठोर निर्बंध घातल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. लोकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी पानसरे यांनी केले.
गतवर्षी १० मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण महापालिका हद्दीत मिळाला होता. आता वर्षभरानंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढत असताना, बुधवारी नेमक्या १० मार्च रोजीच प्रमुख १० प्रकारचे निर्बंध लादण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे.
असे आहेत निर्बंध
nदुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहतील.nशनिवार आणि रविवारी दुकाने पी-१ आणि पी-२ या समविषम तत्त्वानुसार खुली ठेवता येतील. nखाद्य व शीतपेयाच्या सर्व गाड्या सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील.nभाजी बाजार ५० टक्के क्षमतेनुसार सुरू ठेवता येणार आहे. nलग्न व हळद सभारंभ सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत आखून दिलेल्या मर्यादेनुसार करावे. अन्यथा वधू, वर आणि हॉलमालकाविरोधात गुन्हा दाखल करणार.
nबार रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार. nहोम आयसोलेशन असलेले रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास कारवाई केली जाईल. nगुरुवारी महाशिवरात्रीनिमित्त शहरातील ६२ शिवमंदिरे खुली राहतील. पण, दर्शन घेता येणार नाही.nसर्व आठवडीबाजार पूर्णत: बंद राहणार आहेत. nपोळीभाजी केंद्रे रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
एकाच दिवसात आढळले कोरोनाचे ३९२ रुग्ण
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. मनपा हद्दीत बुधवारी नवीन ३९२ रुग्णांची भर पडली. मंगळवारी २१८ रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत बुधवारी नवीन १७४ रुग्णांची भर पडल्याने मनपा प्रशासनाची चिंता वाढली आहे.
मागील २४ तासांत उपचाराअंती १६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, नव्याने आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे अंशत: लॉकडाऊन होण्याचे संकेत मिळत आहेत. बुधवारच्या रुग्णांमुळे मनपा हद्दीतील एकूण रुग्णसंख्या ६५ हजार ४६५ रुग्ण आढळले आहेत, तर यातील ६१ हजार ८९६ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. मागील २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सध्या दोन हजार ३६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वाधिक रुग्ण डोंबिवली पूर्व आणि कल्याण पश्चिममध्ये आढळून येत आहेत. बुधवारीही डोंबिवली पूर्वेत १२९ तर कल्याण पश्चिमेत १२८ रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीअंती आढळून आले आहे.
१७४ रुग्णांची भर : चिंता वाढली