डोंबिवली: यंदा भारतीय सैन्याने अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे तसेच २०२४ हे कारगिल विजयाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे या दोन्ही घटनांचे औचित्य साधून डोंबिवलीच्या टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळतर्फे नमस्ते शौर्य फाउंडेशनचे भारतीय सैनिकांची विजय गाथा सांगणारे एक चित्र प्रदर्शन शनिवार, २३ सप्टेंबर ते बुधवार,२७ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवात म्हणजेच सुयोग मंगल कार्यालय नंबर २ येथे विनामूल्य आयोजित केले आहे. या प्रदर्शनात भारतीय सेनेची विजयगाथा तसेच पाकिस्तान आणि चीन सोबत झालेल्या युद्धातील काही फोटो तसेच भारतीय युद्ध नौका, वायुसेनेची हेलिकॉप्टर काही विमानांचे मॉडेल्स, बोफोर्स तोफा आणि बरच काही पाहायला मिळणार आहे.
युद्धात दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल परमवीर चक्र विजेत्या भारतीय सैन्यातील २१ जवानांची माहिती पण येथे वाचायला मिळणार आहे. डोंबिवली ते बदलापूर परिसरात रहाणारे काहि सैन्यदलातील जवान या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी निवृत्त मेजर आर्किटेक्ट विनय देगावकर यांनी मंडळातर्फे या विषयावर प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. भारतीय सैन्याची यशोगाथा सामान्य नागरिक, तरुणाई आणि लहान मुलांपर्यंत पोहोचवण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे विनय देगावकर म्हणाले. उद्घाटनप्रसंगी शौर्य फाऊंडेशनचे कुणाल आणि विलास सुतावणे, मंडळाचे अध्यक्ष सुशिल भावे मंडळाचे उत्सव समिती प्रमुख नंदन दातार आणि कार्यकर्ते उपस्थित होते. केदार पाध्ये यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर उत्सव समिती प्रमुख नंदन दातार यांनी डोंबिवलीकरांना आपल्या मुलांसह या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन केले.