कल्याण: शहराच्या पश्चिम भागातील नेतिवली परिसरात राहणाऱ्या सुमन खोरारे या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सेवेत होत्या. सेवानिवृत्त होऊन एक वर्ष उलटले तरी सेवानिवृत्तीनंतर मिळणारे पैसे या महिलेला अद्याप मिळालेले नाही. महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुन देखील तिला तिचा पैसा मिळत नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
सुमन या सफाई कामगार म्हणून महापालिकेच्या सेवेत कार्यरत होत्या. २८ फेब्रुवारी २०२१ रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या. ३६ वर्ष त्या महापालिकेच्या सेवेत होत्या. सेवानिवृत्तनंतर जे आर्थिक लाभ प्रशासनाकडून दिले जातात. ते लाभ सुमन यांना मिळालेले नाही. त्यात त्या कॅन्सरग्रस्त असल्याने त्यांच्या उपचाराचा खर्च कुठून आणि कशाच्या आधारे करायचा असा प्रश्न सुमन यांच्या पुढे ठाकला आहे. त्यांच्या हाती पैसाच नसल्याने त्या व्याजाने पैसे घेऊन त्यांचा उपचार करीत आहेत. निवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ मिळावेत यासाठी सुमन यांनी महापालिका प्रशासनाकडे अनेक वेळा मागणी केली. प्रशासनातील अधिकारी वर्ग उडवाउडवी उत्तरे देत असल्याचा आरोप सुमन यांनी केला आहे.
सुमन यांनी न्याय मिळत नसल्याने त्यांची व्यथा मनसेकडे मांडली. मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष उल्हास भोईर यांनी सुमन यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. महापालिकेच्या उपायुक्त अर्चना दिवे यांच्याकडे भोईर यांनी सुमन यांच्या प्रकरणी विचारणा केली. येत्या दहा दिवसात सुमन यांना सेवानिवृत्तीनंतचे लाभ मिळाले नाही तर मनसे स्टाईलने प्रशासनाला जाब विचारला जाईल असा इशारा प्रशासनाला दिला आहे. यावेळी मनसेच्या पदाधिकारी चेतना रामचंद्र, गणेश खंडारे, कपील पवार, उदय वाघमारे आदी उपस्थित होते.