अनिकेत घमंडी कल्याण : कोरोनाच्या कडक निर्बंधांच्या काळात रिक्षा चालकांना १५०० रुपयांचे अर्थसहाय्य राज्य शासन देणार आहे, मात्र त्यासाठी एका इंटरनेट लिंकद्वारे रिक्षाचालकांना आधारकार्डची ओळख गरजेची आहे. मात्र अनेकांचे आधारकार्ड बँक खात्याशी जोडले न गेलेले नाही. त्यामुळे कल्याण आरटीओ समोर ते खात्याशी लिंक करण्याचे मोठे आव्हान असून आतापर्यंत ६० हजार रिक्षापैकी अद्याप १० हजार रिक्षांच्या नोंदीदेखील झालेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिना अखेरीस उद्दिष्ट असलेल्या ४० हजार रिक्षाचालकांच्या त्या संदर्भातील नोंदी कशा करायच्या? हा मोठा प्रश्न आरटीओ समोर आहे.
आरटीओ अधिकारी तानाजी चव्हाण यांनी ही माहिती दिली असून कोणतीही चूक होऊ नये यासाठी त्यांनी आता आधारकार्ड लिंक करण्यासंदर्भात आरटीओ कार्यालयात दोन केंद्रे सुरू केली आहेत. त्या माध्यमातून रिक्षाचालकांच्या खात्याशी आधार कार्ड जोडले जाणार आहे. शुक्रवार पासून त्याबाबतचे काम करण्यात येणार होते. त्यासोबतच शनिवार, रविवार दोन दिवसात १० हजारांचा टप्पा पार करण्याचे लक्ष्य असल्याचे चव्हाण म्हणाले. आधी सॉफ्टवेअर मिळत नव्हते, तर त्या पाठोपाठ आता ही समस्या समोर आल्याने प्रत्यक्ष रिक्षाचालकांना मदत मिळण्यासाठी विलंब होत आहे.
आधी सुरुवातीला रिक्षा चालकांना ती लिंक मिळत नव्हती, सतत हँग होत असल्याची समस्या भेडसावली होती. त्यामुळे रिक्षा संघटनानी नाराजी दर्शवली होती. या आरटीओ हद्दीत बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली, मुरबाड अशी मोठी हद्द आहे, त्यामध्ये येणाऱ्या सुमारे ६० हजार रिक्षाचालकांना ती मदत मिळणार आहे. पण त्यात काहींचे परवाना, आधारकार्ड, बँक खाते, लायसन, बँज आदी समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे कामाला विलंब होत असून प्रत्यक्ष मदत मिळायला आणखी किती वेळ लागेल हे आताच सांगता येणार नाही असेही अधिकारी म्हणाले.