डोंबिवली : रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून आरटीओने ठरवून दिलेल्या दरानुसारच रिक्षा भाडे घ्यावे. जादा भाडे घेण्याची गरज नाही. तसेच प्रवाशांनीही ठरवून दिलेले भाडे द्यावे, असे आवाहन शिवसेनेचे माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे यांनी केले आहे.
‘लोकमत’ने गुरुवारी ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत गुरुवारी ‘रिक्षाचालकांच्या लूटमारीने ज्येष्ठ नागरिक झाले बेजार’ या मथळ्याखाली पश्चिमेतील त्रिमूर्ती नगरमधील ज्येष्ठांच्या व्यथा मांडल्या. त्याची दखल घेत म्हात्रे यांनी दोन दिवस त्या परिसरातील रिक्षाचालकांची भेट घेतली. आरटीओ शेअर रिक्षाच्या पहिल्या टप्प्याला नऊ रुपये भाडे ठरवून दिलेले असताना १५ रुपये का घेतले जातात, असा सवालही त्यांनी केला. जादा भाडे घेऊ नका, नागरिकांना त्रास होतो आहे, असे ते म्हणाले. त्यावर रिक्षाचालकांनी मात्र सीएनजी, पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत, खर्च निघत नाही. त्यामुळे शहरात सर्वत्र १५ रुपये भाडे घेतले जाते. त्याला आम्ही काय करू? म्हणून इथेही तेच भाडे घेतले जाते, असे सांगितले. याबाबत रिक्षा युनियनशी बोलणार असल्याचेही म्हात्रे म्हणाले.
निवडणुकीनंतर रोझ गार्डनचा विकास
केडीएमसीची निवडणूक झाल्यावर मिळणाऱ्या निधीतून रोझ गार्डनचा विकास केला जाईल. तसेच लहान मुलांना खेळायला चांगल्या दर्जाची खेळणी, महिलांना विरंगुळा कट्टा, जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांना कट्टा सुरू करण्याचा मानस असल्याचे म्हात्रे म्हणाले. तसेच त्या प्रभागातही काँक्रीट रस्ता करण्यात येणार असून, त्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर असल्याचे ते म्हणाले. कोविडकाळात फाईल पुढे सरकण्यात विलंब झाल्याने समस्या वाढली, अन्यथा आतापर्यंत काम झाले असते असेही त्यांनी सांगितले.